हिंदूंनी आत्मरक्षणासाठी शस्त्रसज्ज होण्याची आवश्यकता असून हिंदू सर्व भेद विसरून एकत्र आले व हिंदूराष्ट्राची निर्मिती केली तरच भारत जगात महासत्ता होऊ शकेल, असे श्रीराम सेना (कर्नाटक)चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालीक यांनी पंढरपुरातील जाहीर कार्यक्रमात बोलताना सांगितले.
क्रांतिवीर वसंतदादा बडवे ट्रस्टच्या वतीने त्यांना ‘हिंदुत्व शौर्य’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी हभप सर्वश्री बद्रीनाथ महाराज तनपुरे, माउली महाराज जोगदंड, भागवताचार्य वा. ना. उत्पात, शंकरमहाराज बडवे, अनिल पवार, अभयसिंह कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते.
काँग्रेस, भाजपासह सर्व राजकीय पक्षांच्या मुस्लीम अनुनयावर घणाघाती हल्ला चढविताना मुतालीक म्हणाले,‘‘मुस्लिमांच्या मतांसाठी काँग्रेस व स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या पक्षांनी भारतमातेची सुरक्षा, शांतता विकली आहे. केवळ खान आडनावामुळे शाहरूख खानची अमेरिकेत कसून तपासणी होते. ते सुरक्षेशी कोणतीही तडजोड करीत नाहीत. मात्र भारत देशात सर्व खानांना मोकळीक असून कधीही या, कोठेही रहा, बॉम्बस्फोट करा, दंगली करा, हत्यारे वाटा, अशी मोकळीक जात्यंधांना दिल्याने देशाची धर्मशाळा झाली आहे.’’
मोठय़ा शहरातील सर्व मशिदीबाहेर पोलिसांच्या सशस्त्र व्हॅन उभ्या असतात, त्या मंदिरांबाहेर का नसतात? त्या मशिदीच्या रक्षणासाठी नसतात तर नमाजानंतर बाहेर पडणाऱ्या मुसलमानांनी हिंदूंवर हल्ला करू नये म्हणून हा बंदोबस्त असतो. बहुतेक सर्व मशिदींमधून मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा असतो हे पोलिसांना माहिती असते, तरीही मशिदीची कधीही झडती घेण्याचे धाडस पोलीस करीत नाहीत. नालायक राज्यकर्ते देशाचे व हिंदूंचे रक्षण करण्यास असमर्थ असल्याने अगामी काळात स्वसंरक्षण करण्यासाठी हिंदूंनी शस्त्रसज्ज होणे गरजेचे आहे.
भाजपने सत्तेवर येऊनही राममंदिरासाठी काहीच केले नाही. हा हिंदूंचा विश्वासघात असून श्रीरामाचा शाप लागल्यानेच उत्तरप्रदेशात भाजपास पुन्हा यश मिळू शकले नाही. पाश्चात्त्य संस्कृतीच्या मागे लागलेल्या हिंदू समाजाची अवस्था वाईट होऊ लागली असून ‘वुई लव्ह जिहाद’च्या नावाखाली हिंदू मुली बाटविल्या जात आहेत.
आपल्या संस्कृतीचे, धर्माचे रक्षण आपण केले पाहिजे. मंगलोर येथे पबमध्ये दारू पिणाऱ्या मुलीस श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिल्यावर चॅनेलवाल्यांनी गहजब निर्माण केला. आपण कोणा शाळेत जाणाऱ्या किंवा मंदिरात जाणाऱ्या मुलीस मारले नाही. आपली संस्कृती तोडून वाया जाणाऱ्या आमच्या भगिनींना वाचविण्यासाठी आपण हे कृत्य केले, असेही मुतालीक म्हणाले.
ह. भ. प. बंद्रीनाथ महाराज तनपुरे या प्रसंगी म्हणाले,की हिंदुत्व विचारधारेमध्येच देशाची एकात्मता साधण्याची शक्ती असून सर्व हिंदूंनी आपआपसातील मतभेद विसरून ‘हिंदू’ म्हणून एकत्र आले पाहिजे.
प्रमोद मुतालीकांना हा पुरस्कार आपल्या हस्ते म्हणजे वारकरी संप्रदायाच्या हस्ते दिला असून त्यांच्या धर्मरक्षणाच्या कामात सर्व वारकरी संप्रदाय पाठीशी असून या निमित्ताने त्यांना श्री विठ्ठलाचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे.
या प्रसंगी हभप शंकरमहाराज बडवे, माउलीमहाराज जोगदंड, भागवताचार्य वा. ना. उत्पात, हिंदू सभानेते अभयसिंह कुलकर्णी, नगरसेविका वैष्णवी बेणारे व कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल पवार यांची भाषणे झाली. पाहुण्यांची ओळख व प्रस्तावना महेश खिस्ते यांनी केली, तर सूत्रसंचालन विवेक बेणारे यांनी केले.
रोख ११ हजार १११ रुपये व मानपत्र असलेला पुरस्कार प्रमोद मुतालीक यांना या प्रसंगी देण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दादाराव जाधव, प्रशांत खंडागळे, दीपक खंडागळे, भावराव साळुंखे,दीपक कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.