जिल्हय़ात तंटामुक्ती अभियान माध्यमातून गावागावांत बैठका घेऊन एकोपा निर्माण करण्यात हिंगोली पोलिसांना यश आले आहे. तंटामुक्त अभियानात मराठवाडय़ात हिंगोलीने या वर्षी सलग दुसऱ्यांदा प्रथम पारितोषिक मिळविले. तर राज्यात पहिल्या दहामध्ये जिल्हय़ाचा समावेश असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी सांगितले.
दाभाडे यांनी सांगितले, की गेल्या वर्षी जिल्हय़ात तंटामुक्ती अभियान युद्धपातळीवर राबविण्यात आले. ५६५ गावांनी अभियानात सहभाग नोंदवला. स्थापन केलेल्या समित्यांनी केवळ तंटा मिटविण्याएवढे काम करू नये, तर कायमस्वरूपी एकोपा निर्माण व्हावा, असे प्रयत्न पोलिसांनी केल्याचे दाभाडे यांनी सांगितले.
जिल्हय़ात १५१ तंटामुक्त गावे पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. वसमत तालुक्यात ६७ व कळमनुरीत ६४ गावांची निवड झाली आहे. पुरस्कारप्राप्त गावांना ८० लाखांचा निधी मिळणार आहे. राज्यात हिंगोली जिल्हा तंटामुक्तीसाठी सातव्या स्थानावर आहे.

Story img Loader