ठाणे जिल्ह्य़ात काँग्रेसची परिस्थिती उणीपुरी असताना जिल्हा काँग्रेस किती बळकट आहे हे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दाखवून देण्यासाठी जिल्ह्य़ातील काँग्रेस नेत्यांनी विविध भागात भाडय़ाच्या व्होल्व्हो बस पाठवून भाडय़ाचे कार्यकर्ते आणले होते. मुरबाड, शहापूर, जव्हार, वाडा, रायगड परिसरातून ही वाहने भरून आणली होती, असे कार्यकर्त्यांच्या चर्चेतून स्पष्ट होत आहे.
देखण्या, वातानुकूलित बसमध्ये बसायला मिळेल. मुंबई पाहायला मिळेल, तेथे गेल्यानंतर भरपूर खायला मिळेल अशा अपेक्षेने आदिवासी बांधव मोठय़ा संख्येने सभेला आणण्यात आले होते. सभेला महिला वर्ग खूप कमी असल्याची खंत राहुल यांनी व्यक्त केली होती. परंतु, ठाणे जिल्ह्य़ासह इतर भागात शेतीची कामे सुरू झाली आहेत. या कामात महिला वर्ग आघाडीवर असतो. त्यामुळे महिलांची संख्या तुरळक होती. शहापूर परिसरात वीस ते पंचवीस गाडय़ा पाठवण्यात आल्या होत्या, असे तेथील कार्यकर्त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांपेक्षा राहुल गांधींना पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होती. मनात शिवसेना, भाजप असलेली मंडळी या सभेला आली होती.
मुंबईला पाणीपुरवठा करणारी मोठी धरणे असूनही ठाणे जिल्ह्य़ाच्या अनेक भागात पाणीटंचाई असते. वर्षांनुवर्षे हा प्रश्न प्रलंबित आहे. या विषयी काँग्रेसने कधीच प्रभावी उपाययोजना केली नाही. या भागात बेरोजगारी आहे, कारखानदारी नाही. निपुण कामगार तयार करण्यासाठी प्रशिक्षण संस्था नाहीत. अनेक वर्षे राज्यात सत्ता उपभोगत असलेल्या काँग्रेसला या भागात प्रभावी कामे करता आलेली नाहीत. स्थानिक पातळीवर काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण आहे. जिल्हा नेते हे गटातटाचे राजकारण सोडवण्याऐवजी गटतट राखण्यात आनंद मानत असल्याने जिल्ह्य़ात काँग्रेस उभारी घेत नसल्याची काँग्रेस नेत्यांची खासगीत टिप्पणी आहे. त्यामुळे राहुल यांच्यासमोर गर्दीचे प्रदर्शन घडवले तरी प्रत्यक्षात ती गर्दी मतदानासाठी किती उतरेल यावरच नेत्यांचे कसब अवलंबून राहणार आहे.

Story img Loader