आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी राज्यातील काही प्रमुख शहरातील काँग्रेस कार्यालयांमध्ये ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ची सोय करण्यात आल्यामुळे आता खऱ्या अर्थाने ‘काँग्रेसची गल्ली ते दिल्ली’ अशी वाटचाल सुरू झाली आहे. देवडिया भवनातून पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
जयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनानंतर लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने काँग्रेसने ‘हायटेक’ वाटचाल सुरू केली. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून त्या दृष्टीने काँग्रेसने संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह अनेक मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांच्या व्यस्ततेमुळे त्यांच्याशी जिल्हा आणि शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांना आपल्या समस्या अडचणी मांडता येत नाही. अनेक नेते नागपूरला येऊन जातात, मात्र त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधू शकत नाही. त्यामुळे आता पक्ष कार्यालयातच व्हिडियो कॉन्फरन्सिंग सोय करण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांना संवाद साधणे सोपे
होईल.
 व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग आजपर्यंत केवळ प्रशासकीय कार्यासाठी केला जात होता. गेल्या काही वर्षांत विविध राजकीय पक्षात ही सोय निर्माण करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नाशिक औरंगाबाद आणि नागपूर या शहरात काँग्रेसने पहिल्या टप्प्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरू केले असून यानंतर जिल्हा पातळीवर ही सोय करण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेस कमिटीने घेतला आहे. देवडिया भवनात व्हिडियो कॉन्फरन्सिंगची सोय करण्यात आली आहे. लवकरच अशी सोय जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात करण्यात येणार आहे त्यामुळे यापुढे नागपूर आणि विविध जिल्ह्य़ातील समस्या व विकासाच्या प्रश्नांवर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी थेट संवाद साधू शकणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुका आणि केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या अनेक योजना लोकाभिमुख करण्यासाठी कार्यकर्त्यांना वेळोवेळी योजनेची माहिती देण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होणार आहे.
 पक्षाला या तंत्रज्ञानाचा जेवढा फायदा होणार आहे तेवढाच तोटा काही स्थानिक नेत्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे सर्व नेते एकोप्याने काम करीत आहेत, असा दावा काँग्रेसचे नेते करीत असले तरी गेल्या काही वर्षांत नेत्यांचे वेगवेगळे गट तयार झाले आहेत. हे सर्व गट वेळोवेळी ऐकमेकांवर अप्रत्यक्षपणे पडद्यामागून टीका करीत असतात. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांकडे छुप्या पद्धतीने पत्र पाठवून नाराजी व्यक्त करीत असतात. आता मात्र या तंत्रज्ञानामुळे थेट वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधून तक्रार करणे सोपे झाले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
या संदर्भात शहर काँग्रेसचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता म्हणाले, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष किंवा केंद्रीय मंत्री यांच्या व्यस्ततेमुळे तसेच सुरक्षेच्या कारणामुळे कार्यकर्ते त्यांच्यापुढे समस्या मांडू शकत नाहीत. यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज होतात. व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे सामान्य कार्यकत्यार्र्ना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधता येणार आहे. या सर्व यंत्रणेवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नियंत्रण राहणार आहे. आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत या नव्या तंत्रज्ञानाचा चांगला फायदा येत्या काळात दिसून येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा