देवगिरी महाविद्यालयात सकाळी आठ वाजता एका वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, तर त्याच दिवशी ११ वाजता एका वर्गात फक्त तेरा विद्यार्थी होते. प्राध्यापकांनी चांगले शिकवावे, एवढी माफक अपेक्षा ठेवण्यात चूक काय? खाली साडी विक्रीचे दुकान आणि वर बीसीए महाविद्यालये आणि विद्यापीठाने त्यांना पत्र पाठविले तर पत्ता सापडत नाही म्हणून परत येते. काही प्रमाणावर रोजगार देणारे अभ्यासक्रम विनाअनुदानित तर रोजगाराची संधी नसणारे अभ्यासक्रम अनुदानित असतात. जी महाविद्यालये उत्तीर्ण होण्याची हमी देतात, तेथे प्रवेशासाठी गर्दी होते, अशी टोलेबाजी करत आमदार सतीश चव्हाण यांनी उच्चशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल आयोजित सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा. शिवाजी मदन यांच्यासह अन्य काही प्राध्यापक-शिक्षकांनी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विक्रम काळे होते.
महाविद्यालयांचे अॅकॅडेमिक ऑडिट करून त्यांचे ग्रेडिंग करण्याची आवश्यकता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यीपाठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा. मदन यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली होती. त्याचा उल्लेख करून आमदार चव्हाण म्हणाले, की यासाठी त्यांना कुणी रोखलेले नाही. परंतु ज्या दिवशी ते असा प्रयत्न करतील, त्या दिवशी कुणी त्यांना पदावर राहू देणार नाही. हातांच्या बोटांवर मोजण्याएवढय़ा संस्थांमध्ये भरतीसाठी पैसे घेतले जात नाही, असे म्हटले जाते. याचा दुसरा अर्थ अन्य संस्थांत पैसे घेतले जातात, असा होतो.
बी. ए. इंग्रजी झालेल्या विद्यार्थ्यांसही इंग्रजी बोलता येत नाही. आपली तुकडी रद्द होऊ नये, यासाठी हुशार विद्यार्थ्यांनाही काही प्राध्यापक अयोग्य विषय घ्यावयास लावतात. विद्यापीठाच्या संदर्भातील नवीन कायद्यात काही बदल झाले नाहीत तर भूमिपूत्र कुलगुरू होणार नाहीत. आपल्या संस्थेत प्राथमिक शिक्षकांसाठी पीएच.डी. झालेल्याचेही अर्ज आले आहेत. मागण्या मांडण्याचा प्राध्यापकांना अधिकार आहे. परंतु त्यासोबतच शासनाच्या खिशात काय आहे, हेही पाहिले पाहिजे. आपण आमदार झालो तेव्हा झाला नव्हता एवढे सत्कार मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीसपदी निवडून आल्याबद्दल होत आहेत. या संस्थेवर नवीन निवडून आलेले पदाधिकारी संस्थापक ३४ सदस्यांपैकी काहींची नातवंडे व मुले आहेत. या संस्थेत नोकरीसाठी पूर्वी पैसे घेतले जात होते किंवा नव्हते हे आपणास माहीत नाही. कारण या संस्थेत आपल्या घरातून कुणीही नोकरीस लागलेले नाही, असेही आमदार चव्हाण म्हणाले.
आमदार विक्रम काळे यांनी आपल्या भाषणात शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न शासनाचे विविध निर्णय, टोपे यांच्याकडून अपेक्षित घोषणा इत्यादी बाबी सविस्तर मांडल्या. प्राध्यपकांच्या प्रश्नांवर मंत्री राजेश टोपेच नव्हे, तर राज्यमंत्री डी. पी. सावंत हेही कॅबिनेटमध्ये उभे राहून भांडले आणि त्यास आपण साक्षीदार होतो, असेही त्यांनी भाषणाच्या ओघात सांगून टाकले. आपण कोणकोणत्या मागण्या शासनाकडून मंजूर करवून घेतल्या हे सांगताना त्यांनी प्राध्यापकांच्या प्रश्नात आपण मुख्यमंत्र्यांकडे मध्यस्थी केली होती. मंत्री टोपे यांच्या मतदारसंघातील घनसावंगीसारखी दहा गावे लातूर जिल्हय़ात असली तरी तेथे एवढा विकास दिसत नाही. वाढप्याचे काम हातात असल्याने टोपे दोन लाडू जालना जिल्हय़ास अधिक देण्याचे काम करतात, असेही ते म्हणाले. टोपे यांच्या मतदारसंघातील कार्यकर्ते विमानतळापर्यंत कामे घेऊन येतात, असा उल्लेख त्यांच्या सभोवती असलेल्या गर्दीच्या संदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी केला होता. त्यांचा संदर्भ देऊन आमदार काळे यांनी गुळाला मुंगळे चिकटणारच असे व्यक्तव्य केले.
टोपे म्हणाले, की आमदार काळे विधिमंडळ सभागृहात बोलत आहेत की काय, असे मला वाटले. ते उत्तम कामगारनेते होऊ शकतात. सभागृहात ते अनेकदा विरोधी पक्षात असल्यासारखे बोलतात आणि त्यासंदर्भात पक्षनेतृत्वाने त्यांना अनेकदा सूचनाही केलेल्या आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांवर ते आग्रही असतात आणि मंत्री म्हणून मला जे सांगायचे ते त्यांच्या भाषणात येऊन गेलेले आहे. आमदार सतीश चव्हाण यांचे नवीन निवडीबद्दल अभिनंदन करून ते चांगले संघटक, मित्र, इतरांकडून काम करवून घेण्याची हातोटी असलेले तसेच मराठवाडय़ाच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील असणारे आहेत, असेही ते म्हणाले. सत्काराच्या कार्यक्रमानिमित्त ‘शिक्षण परिषद’च झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा