चारचौघांसारखे आपणही विवाहाच्या बोहल्यावर चढावे..हातातील चुडा, रंगलेल्या मेंहदीत, मित्र मैत्रिणींच्या घोळक्यात चेष्ठा मस्करीचे क्षण अनुभवावे अशी सुप्त इच्छा असलेल्या एचआयव्ही बाधित विवाहेच्छुकांची रेशीमगाठ ‘मंगल मैत्री’ मेळाव्याच्या माध्यमातून जुळली. या जोडप्यांना येथील महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि यश फाऊंडेशन यांच्या विद्यमाने रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सदिच्छा देण्यात आल्या.
संस्थेच्या वतीने एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना सन्मानाने जगता यावे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मंगलमैत्री मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाव्दारे विवाहेछुक वधू-वरांचा मेळावा तसेच समूपदेशन यासह अन्य उपक्रम राबविण्यात येतात.
मेळाव्याच्या माध्यमातून जुळलेल्या पाच जोडप्यांचे स्वागत भारतीय वन सेवा उपवनसंरक्षक अधिकारी अनिता पाटील, महिंद्राचे नामदेव येलमामे, मनोज निकम, यश फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनिता पाटील यांनी नवदाम्पत्यांना जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा व एकमेकांच्या सोबतीने सुखाचा संसार करण्याचा सल्ला दिला. प्रातिनिधीक स्वरूपात मनोगत व्यक्त करतांना एका नवविवाहितेने १५ वर्षांपासून जोडीदाराचा शोध सुरू होता. आज मेळाव्यामुळे हा शोध संपल्याचे सांगितले.
आमच्यातील मैत्री आणि विश्वासामुळे आमचा संसार समाजापुढे आदर्श असेल, असा आशावाद तिने व्यक्त केला. तर, वराने या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी नवविवाहितांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. स्वागत समारंभात वधू-वरांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
‘मंगल मैत्री’ मेळाव्यात एचआयव्हीबाधित जोडपी नाजूक रेशीमगाठीत बंदिस्त
चारचौघांसारखे आपणही विवाहाच्या बोहल्यावर चढावे..हातातील चुडा, रंगलेल्या मेंहदीत, मित्र मैत्रिणींच्या घोळक्यात चेष्ठा मस्करीचे क्षण अनुभवावे अशी सुप्त इच्छा असलेल्या एचआयव्ही बाधित विवाहेच्छुकांची
First published on: 30-04-2015 at 07:55 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hiv infected couples get married in nashik