‘डायलिसीस’ करण्यासाठी खरेदी केलेल्या ११ यंत्रापैकी केवळ ८ यंत्रे सुरू असल्याने संदर्भ सेवा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एचआयव्हीबाधित रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात येत आहे. वास्तविक उपलब्ध यंत्रापैकी एक यंत्र हे केवळ एचआयव्ही बाधितांसाठी उपलब्ध असावे असा शासकीय निकष आहे. परंतु, संदर्भ सेवा रुग्णालयाने त्या निकषाला हरताळ फासल्याची बाब एड्स दिनाच्या पूर्वसंध्येला पुढे आली आहे.
ज्या रुग्णांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत, शस्त्रक्रियेदरम्यान एखादी किडनी निकामी झाली अशा रुग्णासांठी संजीवनी म्हणून ‘डायलिसीस’ प्रक्रियेकडे पाहिले जाते. रुग्णांच्या शारीरिक तसेच किडनीच्या क्षमतेवर ही प्रक्रिया किती वेळा करावी हे ठरते. या प्रक्रियेसाठी सुरूवातीला साधारणत: पाच ते सहा तासाचा कालावधी लागतो. तिसऱ्या वेळेपासून यासाठी केवळ दीड ते दोन तास पुरेसे असतात.
खाजगी दवाखान्यात या प्रक्रियेसाठी एका खेपेला नऊ ते दहा हजार रुपये खर्च होतो. दिवसाआड जर ही प्रक्रिया आवश्यक असेल तर रुग्णांच्या आर्थिक क्षमतेवर त्याचे ‘जीवनमान’ अवलंबून आहे हे उघड आहे. रुग्णांवरचा आर्थिक भार हलका करण्यासाठी येथील संदर्भ सेवा रुग्णालयात डायलिसीस यंत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दारिद्रयरेषेखालील रुग्णांना ही सेवा मोफत तर दारिद्रयरेषेवरील रुग्णांसाठी केवळ ५०० रुपये हे नाममात्र शुल्क आकारले जाते.
राज्य शासनाने ‘डायलिसीस’ करण्यासाठी ११ यंत्र संदर्भ सेवा रुग्णालयास उपलब्ध करून दिली आहेत. मात्र, त्यातील ८ यंत्रे सध्या सुरू आहेत. सरकारी निकषानुसार रुग्णालयात सहा डायलिसीस यंत्रे अपेक्षित आहे. त्यापैकी चार यंत्रे हे सर्वसामान्य रूग्णांसाठी, एक कावीळ ब आणि एक यंत्र एचआयव्ही बाधित किंवा एड्स रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. या रुग्णालयातील रुग्णांची संख्या मोठी असल्याने शासनाने काही जादा यंत्रे उपलब्ध करून दिली. संदर्भ सेवेत आठ यंत्र सर्वसामान्य रुग्णांसाठी वापरली जातात. उर्वरीत तीन यंत्र अद्याप कार्यान्वित होऊ शकली नाहीत. त्याचा फटका कावीळ-ब आणि एचआयव्हीबाधीत रुग्णांना बसला आहे.
अती जोखमीचे म्हणून या रुग्णांकडून खासगी रुग्णालयात नियमीत शुल्कापेक्षा जादा रक्कम वसूल केली जाते. सध्या शहरातील ३५ हुन अधिक ‘कावीळ ब’च्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात ‘डायलीसीस’ करावे लागत आहे. तर डायलीसीस आवश्यक असणाऱ्या एचआयव्हीबाधितांची नोंदच नसल्याचे सांगण्यात आले.
या संदर्भात संदर्भसेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत सोनार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कावीळ ब साठी एक यंत्र लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यासाठी मनुष्यबळ वाढविण्यात येत आहे. मात्र एचआयव्हीबाधीत रुग्णांची संख्या कमी असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे यंत्र उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी असमर्थता दर्शविली.