शहरातील मुख्य बाजारपेठेत खूश जैन या शालेय विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर अस्ताव्यस्तपणे लावल्या जाणाऱ्या फलकांसाठी विशिष्ट कालमर्यादा निश्चित करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. प्रमुख रस्ते, चौक व गल्ली-बोळात लागणाऱ्या फलकांनी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूकच नव्हे तर, संपूर्ण शहराच्या वाहतुकीवर विपरीत परिणाम होत असल्याचे लक्षात येते. या फलकांची बेसुमारपणे गर्दी वाढत असताना अनधिकृत फलकांवर पालिका कारवाई करीत नसल्याचा वाहनधारकांचा आक्षेप आहे.
शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेला चौका-चौकात आणि हमरस्त्याला लागून लावण्यात येणारे भले मोठे फलकही अडथळा ठरत आहेत. कुठल्या मजकुराचा किंवा जाहिरातीचा फलक किती आकाराचा हवा याचाही कोणताही धरबंद नाही. निरनिराळे राजकीय पक्ष, संघटना व संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते अथवा सामान्य जनांपैकी कुणाचे यश, निवड, वाढदिवस हे सर्व रस्त्यांवर फलकाद्वारे साजरे करण्यावर भर दिला जातो. परिणामी, असे फलक लावणाऱ्या हौशी कलाकारांची संख्या हजारोंनी वाढली आहे. मुख्य बाजारपेठेतील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये वर्षभरात कुठल्याही दिवशी एक तरी फलक हमखास असतो. त्या फलकास पालिकेने किती दिवसांसाठी परवानगी दिली याचा उल्लेख नसतो. यामुळे एखाद्या दुसऱ्या पक्ष वा संघटनेला फलक लावायचा असला तरी तो पहिला फलक काढू शकत नाही. यामुळे आता फलकांना कालमर्यादा घालून देण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सुरू झाला आहे. अर्थात, ही सगळी घडामोड खूश जैन या शाळकरी मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर सुरू झाली आहे.
खरे तर महापालिका हद्दीत कुठेही फलक लावायचा असल्यास पालिकेच्या वसुली विभागाची परवानगी आवश्यक असते. केवळ या विभागाची परवानगी नाही तर तत्पूर्वी संबंधित पोलीस ठाण्याचा ‘ना हरकत दाखला’ घ्यावा लागतो.
फलकावर नेमका कोणता मजकूर लिहिला जाणार याची माहिती पालिका व पोलिसांना सादर करावी लागते. अल्प मुदतीसाठी एक रुपया चौरस फूट प्रती दिवस तर दीर्घ मुदतीसाठी पालिकेच्या जागेवर ६०० रुपये वर्षांला भाडे द्यावे लागते. हे फलक उभारताना अनेक ठिकाणी आडवे-उभे लांब बांबू वापरले जातात.
काही ठिकाणी जमिनीपासून कमी उंचीवर फलक लावले जातात. त्यामुळे रस्त्यावरून समोरून येणारी वाहने दिसत नाहीत आणि अपघाताला निमंत्रण मिळते. केवळ फलक आडवा झाल्यामुळे शहरात झालेल्या अपघातांची संख्याही कमी नाही. यामुळे शाळकरी मुलाच्या अपघातानंतर अनधिकृत फलक उतरविण्याची हालचाल पालिकेने सुरू केली आहे.
शहरातील फलकबाजीही अपघातास कारणीभूत
शहरातील मुख्य बाजारपेठेत खूश जैन या शालेय विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर अस्ताव्यस्तपणे लावल्या जाणाऱ्या फलकांसाठी विशिष्ट कालमर्यादा निश्चित करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. प्रमुख रस्ते, चौक व गल्ली-बोळात लागणाऱ्या फलकांनी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूकच नव्हे तर, संपूर्ण शहराच्या वाहतुकीवर विपरीत परिणाम होत असल्याचे लक्षात येते.
First published on: 04-07-2013 at 12:12 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hoarding causes accident in the city