ऐतिहासिक करवीर नगरीच्या सौंदर्याला बाधा आणणारे फ्लेक्स हटविण्याचे आदेश आले की तोंडदेखली कारवाई करायची आणि काही दिवसातच आदेशाकडे पाठ फिरवायची, असा खाक्या सुरू आहे. त्यामुळे कोल्हापुरातील लहान-मोठे रस्ते हे जणू फ्लेक्स मार्ग ठरले आहेत. आता उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे फ्लेक्स-बॅनर हटविण्याच्या मोहिमेला गती आली आहे खरी. पण तेथेही राजकारण्यांचा अडसर ठरू लागलाआहे. स्पर्धेमध्ये एका आमदारांचा उभारलेला फ्लेक्स असाच वादात उभा असल्याचे आज स्पष्ट झाले. प्रशासनाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता अनेकदा लावल्या गेल्या आहेत. पण किमान पक्षी उच्च न्यायालयाच्या आदेशाची कदर ठेवून अवघे कोल्हापूर फ्लेक्समुक्त होणार का? हाच खरा प्रश्न आहे.
दशकभरापूर्वी फ्लेक्सचे तंत्रज्ञान शहरात दाखल झाले. कोणत्याही माहितीचा फ्लेक्स अवघ्या अध्र्या तासातआणि तोही रंगीबेरंगी आकर्षक मजकुरासह उपलब्ध होऊ लागला. कापडी बॅनरच्या तुलनेत स्वस्तात उपलब्ध होणारे हे तंत्र गल्लीबोळात पसरले. बारीक-सारीक कारणांपासून ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटनांचे पडसाद फ्लेक्सच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचू लागले. महापालिकेने उत्पन्न वाढीचा हमखास मार्ग म्हणून फ्लेक्स उभारण्याला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. परवानगी घेऊन उभारण्यात आलेले कमी आणि विनापरवाना फ्लेक्सची न मावणारी गर्दी अधिक, असे चित्र शहराच्या प्रत्येक चौकात, रस्तोरस्ती दिसू लागले. वाढत्या फ्लेक्सचा प्रादूर्भाव होऊन ऐतिहासिक नगरीला विद्रूपीकरणाचा कलंक लागला. फ्लेक्ससमाजसेवकांची नवी पिढीच सेवारथ झाली. होळी-दिवाळीचा सण, नेत्यांचे स्वागत, मिसरूडंही न फुटलेल्यांचे स्वागत, सभा, शिबिर, मोफत वाटप, स्पर्धा-उपक्रम, व्यापार-उद्योग यांच्या योजना अशा कोणत्याही विषयांवरून फ्लेक्स उभारले गेले. शहराच्या दौऱ्यावर आलेल्या बडय़ा नेत्यांनी विनापरवाना फ्लेक्स उभारू नयेत, असे आदेश कार्यकर्त्यांना अनेकदा दिले. पण कार्यकर्त्यांनी या आदेशाची वासलात लावली आहे. महापालिका प्रशासनानेही फ्लेक्सबाबत तक्रारी होऊ लागल्या की ती हटविण्याची मोहीम उघडण्यास सुरुवात केली. पण त्यामध्ये सातत्याचा अभाव असल्याने फ्लेक्सचे जंजाळ कायमपणे उभे आहे. प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली की त्यांना नगरसेवक, कार्यकर्ते यांचाच रोष पत्करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाची इच्छा असूनही ही मोहीम लटकत राहिल्याचे चित्र वारंवार दिसले आहे.
महालक्ष्मी मंदिर, भवानी मंडप या वास्तू छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील यांसारखे पुतळे आणि शहरातील अनेक वास्तू इमारत यांना विद्रूपीकरणाचा फटका बसला आहे. या वास्तुपुतळ्यांचे सौंदर्य पाहणाऱ्याला मोहित करणारे आहे. पण त्याच्याभोवती फ्लेक्स बॅनरचा विळखा पडलेला असल्यामुळे सौंदर्याचा आस्वाद घेणे कठीण होऊन बसले आहे.
या प्रकाराविरुद्ध सामाजिक संस्था, नागरिकांनी अनेकदा आवाजही उठविला आहे. तक्रार सुरू झाली, की प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचे कान पिळतात. मोहिमेला गती येते. विनापरवाना फलक दिवसाढवळ्या जमीनदोस्त होतात. पण त्याची धग हाताच्या बोटावर मोजावी इतके दिवसच राहते. पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच अवस्था होत राहते. गेल्या वर्षभरात एकटय़ा अतिक्रमण निर्मूलन पथकाने विभागीय कार्यालय २ ने एक हजार फ्लेक्स हटविले आहेत. विशेष म्हणजे या विभागात महालक्ष्मी मंदिर, शिवाजी पुतळा, मिरजकर तिकटी, बिंदू चौक असा महत्त्वाचा भाग आहे. याच ठिकाणी पर्यटन व व्यापाराच्या निमित्ताने सततची गर्दी असते. त्यामुळे या भागात फ्लेक्सचे पीक तरारून आल्याचे दिसते. वर्षभरात एक हजार फ्लेक्स काढले, तरी अजूनही तेथील फ्लेक्स कमी होण्याचे प्रमाण मात्र अजिबात नसल्याचा अनुभव आहे. आता थेट उच्च न्यायालयाने फ्लेक्स हलवावेत, असा आदेश दिला आहे. या आदेशाची तरी कितपत बुज राखली जाते हा चर्चेचा मुद्दा बनला आहे.
कोल्हापुरात फलक हटले पण सातत्य कायम राहणार का?
ऐतिहासिक करवीर नगरीच्या सौंदर्याला बाधा आणणारे फ्लेक्स हटविण्याचे आदेश आले की तोंडदेखली कारवाई करायची आणि काही दिवसातच आदेशाकडे पाठ फिरवायची, असा खाक्या सुरू आहे. त्यामुळे कोल्हापुरातील लहान-मोठे रस्ते हे जणू फ्लेक्स मार्ग ठरले आहेत. आता उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे फ्लेक्स-बॅनर हटविण्याच्या मोहिमेला गती आली आहे खरी. पण तेथेही राजकारण्यांचा अडसर ठरू लागलाआहे.
First published on: 16-03-2013 at 01:07 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hoarding moved but if the continuity isnt permanent