उरण, पनवेल शहरात तसेच नाक्यानाक्यांवर लावण्यात येणाऱ्या पोस्टर्समुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येत आहे. या विरोधात कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाने वारंवार आदेश दिले असतानाही असे प्रकार घडत असून यामध्ये परिसरातील राजकीय पक्षच आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. सतत होणाऱ्या या पोस्टरबाजीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
पोस्टर व बॅनर्समुळे सार्वजनिक रस्त्यावरील गतिरोधक, स्थानकांची नावे, दिशादर्शक फलक, वळणांची सूचना, एका ठिकाणापासूनचे दुसऱ्या ठिकाणापर्यंतचे दर्शविणारे अंतर आदींची माहिती देणारे फलक झाकले जात आहेत. त्यामुळे अनोळखी वाहन चालक आणि नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे. हे फलक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेत असल्याने त्यांची परवानगी घेणे आवश्यक असताना पोस्टर्स, बॅनर्स लावणाऱ्यांकडून तशी कोणतीही परवानगी घेतली जात नसल्याचे सांगितले जाते.
रस्त्यावरील प्रवास करणाऱ्या वाहनांना वळण घेताना तसेच ज्या ठिकाणी जायचे आहे तेथील अंतर दिशा स्पष्ट करणाऱ्या माहितीदर्शक फलकांची जागा या बॅनर्सनी घेतल्याने त्याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. या बॅनर्समुळे अपघातही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी बेकायदा लावण्यात आलेले बॅनर्स हटविण्याची मागणी उरणच्या सामाजिक संस्थेने केली होती. मात्र या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंत्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Story img Loader