राज्यभर निसर्गाने दाखविलेल्या लहरीमुळे बळीराजाच्या जीवनाचे रंगच पुसून गेले आहेत. त्याच वेळी मुंबईच्या नभात मात्र लाल, पिवळ्या, जांभळ्या, गुलाबी फुलांची रंगपंचमी सुरू झाली आहे. सोनमोहोर, पर्जन्यवृक्ष, तामण, पिचकारी, काटेसावर हे वृक्ष बहरू लागले असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गुलमोहोर, बहावा, पळसही येत्या महिन्याभरात लाल-पिवळ्या रंगांची महीरप बांधणार आहेत.
शहरातील इमारती, वाहने, माणसांची गर्दी यांना सामावून उरलेल्या जागेत रस्त्याकडेला, इमारतींच्या सावलीला, रेल्वे रुळांच्या बाजूला कशीबशी उभी राहिलेल्या या झाडांकडे नेहमीच्या घाईगडबडीत फारसे लक्षही जात नाही. चालताना डोक्यावर पडलेली बारीक काडी किंवा गाडीवर झालेली पानगळ यामुळे त्यांचे अस्तित्व काहींना जाणवते. बहुसंख्य सावलीत चालता यावे यापुरताच झाडांचा विचार करतात. मात्र आता हे चित्र पालटले आहे. जानेवारी-फेब्रुवारीपासून पोपटी, चमकदार पानांनी सूर्यप्रकाशात लकाकणाऱ्या झाडांवर आता रंगांची उधळण करणारी असंख्य फुले उमलू लागली आहेत. मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडलेल्यांना रस्त्यावर पडलेला फुलांचा गालिचा व फुलांनी बहरलेल्या झाडांचा नजारा शांतपणे न्याहाळता येत आहे. धावपळ करत कार्यालय गाठणाऱ्यांना रस्त्यावर पडलेली फुले झाडाच्या देखणेपणाची जाणीव करून देत आहेत.
मुंबईत रस्त्याकडेला ओळीने लावलेली सोनमोहोर, पर्जन्यवृक्षाची झाडे आता ओळखीची झाली आहेत. पिवळ्या फुलांचा सडा पाडणारा सोनमोहोर आणि गुलाबी बारीक तंतूची नाजूक फुले ल्यायलेला पर्जन्यवृक्ष यामुळे मुंबईच्या रस्त्यावर पिवळ्या-गुलाबी रंगांची सजावट केल्यासारखे वाटते. शहराच्या बहुतेक सर्व रस्त्यांवरील विदेशी जातीची ही दोन्ही झाडी पक्की मुंबईकर झाली आहेत. इमारतीच्या उंच गॅलरीमधूनही अनेक मुंबईकरांना पिवळ्या, गुलाबी रंगाचा गालिचा पाहण्याचा अनुभव मिळू शकतो. या दोन झाडांसोबतच राज्यवृक्ष तामणही बहरत आहे. गुलाबी, जांभळ्या छटेच्या या फुलांना ओळखण्यासाठी विशेष मेहनत करावी लागत नाही. दक्षिण मुंबईत ही झाडे अधिक आहेत. पिवळ्या कडेची नक्षी असलेली पिचकारीची (स्पॅथोडिया )
निवडणुका, दहावी-बारावीच्या परीक्षा आणि उन्हाळ्याची चाहुल.. वातावरणात एकीकडे या सगळ्यांचा तणाव असतानाच टोलेजंग इमारती, दोन्ही बाजूंची रुंदी वाढत जाणारे रस्ते, लोकलचे रुळ यांच्या कडेकडेने उभे राहत फुलणाऱ्या झाडांनी काही काळासाठी का होईना, पण मुंबईचा नजारा बदलून टाकला आहे. मुंबई विद्यापीठ परिसर, सागर उपवन, भायखळा राणी बाग, आरे कॉलनी, राष्ट्रीय उद्यान, पवई आयआयटी या ठिकाणी विपुल संख्येने असलेली झाडे पाहायला व समजून घ्यायला वेळ नसला तरी सहज रस्त्याने जाता-येता बहरलेल्या मुंबईचे दर्शन कोणालाही घेता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा