* ६० टक्के भागात पाण्याची नासाडी     *  व्यापाऱ्यांच्या घरी मुबलक पाणी]
दुष्काळग्रस्त परिस्थिती  ‘पाणी जपून वापरा’ असे आवाहन केल्यानंतर त्या आवाहनाला झुगारून उपराधानीतील काही भागात रंग.. पाण्याची उधळण.. मद्य आणि सोबतच चणा चिवडय़ाचा आस्वाद घेत डीजे व ढोल ताशांच्या तालावर धूम करीत आबालवृद्धांनी यथेच्च पाण्याचा वापर केला. शहरातील काही भागात हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असताना त्यावर मात्र, कोणाचे नियंत्रण नसल्याचे दिसून आले. मंगळवारी रात्री होळी पेटत नाही तोच विविध वस्त्यामध्ये सर्वत्र चढू लागलेला धुळवडीचा रंग बुधवारी रात्रीपर्यंत उतरायचे नाव घेत नव्हता.
धुलिवंदनाच्या दिवशी नागरिकांना पाण्याची नासाडी न करता गुलालाची कोरडी होळी खेळा, असे आवाहन केल्यानंतरही या आवाहनाला झुगारून उपराजधानीतील अनेक सुशिक्षित वस्त्यासहीत काही झोपडपट्टी भागात यथेच्छ पाण्याचा वापर करून हजारो लिटर पाण्याची नासाडी केल्याचे चित्र शहरातच दिसून आले. अनेकांनी अपार्टमेंट आणि वस्त्यामध्ये तर पाण्याचे ड्रम भरून ठेवण्यात आले होते. शहरातील विविध भागात एकमेकांना रंग लावीत असताना पाण्याचा वर्षांव केला जात होता. काळा, हिरवा, पिवळा पांढरा, लाल चंदेरी सोनेरी अनेकविध रंग फासलेल्या चेहऱ्यांच्या आड न सामावणारा चेहरा बोंबाच्या मार्गाने बाहेर येत होता. अनेकांच्या चेहऱ्याच्या आणि कपडय़ाचाही अवतार विदूषकाला शोभण्यासारखा झाला होता. जवळच्या माणसांना ओळखणे कठीण झाले होते.रंगाच्या भितीने बाहेर न पडणाऱ्या वस्त्या वस्त्यामधील मित्रांना घरात काढत यथेच्छ रंगविण्याची परंपरा  जपण्यात आली. तरुणांनी तर समाजातील सभ्य मंडळीचे आणि पर्यावरणाचे सर्व संकेत धुडकावून लावत बेधुंदपणे धुळवड साजरी केली. केवळ माणसांचे चेहरे नव्हे तर शहरातील सर्व रस्ते गल्लोबाळा रंगानी माखल्या होत्या. शहरातील अनेक भागात डीजे तर काही ढोल ताशांच्या तालावर नृत्य करीत होते. वस्तीमध्ये होळी पेटलेल्या ठिकाणी तरुणांनी केलेल्या नृत्याला तोड नव्हती. धुळवडीच्या या उत्साहात पाण्याची टंचाई जाणवू नये अनेक अपार्टमेंटमध्ये आधीच लोकांनी पाण्याची टाकी भरून ठेवली होती.
शहरातील धरमपेठ, लक्ष्मीनगर, गोकुळपेठ, प्रतापनगर या भागात धूळवड खेळणाऱ्यामध्ये परप्रांतीय विद्यार्थी आीिण नागरिकांची संख्या अधिक होती.  शहरातील विविध भागातील चौकाचौकांमध्ये उभे राहून एकमेकांना तरुणाई रंग लावत
होती.
व्यापारी ओळीत यथेच्छ पाणी वापर
शहरातील व्यापारपेठ असलेल्या इतवारी आणि सराफा ओळीत व्यापारांनी एकमेकांना रंग लावून धुळवडीचा आनंद साजरा केला. इतवारी परिसरात व्यापारांनी पाण्याचा यथेच्छ वापर केला. अनेक वस्त्यामध्ये महिलांनी सुद्धा एकमेंकाना रंग लावत धुळवड साजरी केली. धुळवडीच्या सर्वात जास्त मजा असते ती लहान मुलांची. लहान मुलांनी मस्ती करीत रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या अंगावर पिचकाऱ्याने रंग उडवित होते.
मद्य पिऊन वाहन चालवून नका, असे आवाहन केल्यानंतरही बुधवारी शहरातील विविध भागात ५७८ पेक्षा अधिक ‘तळीरामां’वर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख २१ हजार रुपये वसूल करून त्यांचे ड्रायव्हिंग परवाने रद्द करण्याची सूचना आरटीओला दिली जाणार आहे. बेदरकार वाहने चालवणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांची वाहने जप्त केली. शिवाय जुगार अड्डय़ावर कारवाई करून २० आरोपीना अटक करून ४ हजार ६५५ चा मुद्येमाल जप्त करण्यात आला.