नवी मुंबईत प्रचंड उत्साहात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. पाण्याचा सडा टाकून त्यावर आकर्षक रांगोळी रेखाटून सजवलेली होळी. भक्तिभावनेने केलेले तिचे विधिवत पजून.. कापराच्या साहाय्याने होम पेटवल्यानंतर हातातील डमरू व डफ वाजवत होळी रे होळी पुरणाची पोळी असे ओरडत त्या भोवती नाचणाऱ्या बालगोपाळांचा जल्लोष सर्वाचेच लक्ष वेधून घेत होते. चौकाचौकांत भव्य होळी पेटवल्या गेल्या होत्या. अनेक ठिकाणी होळीभोवती सप्तरंगी रांगोळय़ा रेखाटण्यात आल्या होत्या. तर आयुष्यातील मोलाचे क्षण मोबाइलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आघाडीवर असणाऱ्या तरुणाईने होळीच्या सणालादेखील ही संधी सोडले नाही. अनेकांना पेटलेल्या होळीच्या आकाशाकडे झेपावत असलेल्या ज्वाळा मोबाइल व कॅमेऱ्यामध्ये टिपल्या.
जे. व्ही. एम. मेहता महाविद्यालय, दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय तसेच आदी महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनीही होळीच्या रंगात मनसोक्त रंगत होळी साजरी केली. या वेळी होळीची धूम महाविद्यालयात आणि शाळांमध्ये दिसून येत होती. होळीच्या दिवशी महाविद्यालय आणि शाळा सुरू असल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनी आपल्यासोबत विविध प्रकारची रंग घेऊन आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला रंगवायचे याच इराद्याने आले होते. त्यामुळे महाविद्यालयाच्या व शाळेच्या प्रांगणात होळीचा जल्लोष होता. लाल, हिरवा, निळा, पिवळा, जांभळा अशा विविध रंगांची उधळण होऊन होळी होळी.. च्या आवाज परिसरात घुमला.