उत्साह, जल्लोषामध्ये रंगाची उधळण करीत सोमवारी ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर शहरामध्ये बहुतांश ठिकाणी धुळवड साजरी करण्यात आली. उत्साही तरुणाईबरोबरच, महिला आणि आबालवृद्धांनी या होळीचा आनंद लुटला. इतरांना त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत हा रंगाचा उत्सव दिवसभर सुरू होता. नाक्यानाक्यांवर जथेच्या जथे होळीचा आनंद लुटताना दिसून आले. पाण्याचा अपव्यय टाळा, गारपीटग्रस्तांसाठी मदत करा, आपल्या होळीचा दुसऱ्यांना त्रास नको असे आवाहन करणारी सामाजिक बांधीलकी जपणारी होळीदेखील शहरात वेगवेगळ्या ठिकाणी साजरी झाली.
रविवारी सायंकाळी होळी पेटवून उत्सवाची सुरुवात करण्यात आल्यानंतर लगेच अनेक ठिकाणी धुळवडीचा जल्लोष सुरू झाला होता. रात्री डीजेच्या तालावर अनेकांनी शहरात वेगवेगळ्या चौकांमध्ये, इमारतींमध्ये फेर धरला होता. सोमवारी सकाळपासून तरुणांचे जथेच्या जथे धुळवडीचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले होते. अनेक सोसायटींमध्ये डीजेच्या तालावर तरुणांनी फेर धरत धुळवड साजरी केली. यंदा दुष्काळग्रस्त स्थिती नसली तरीही पाणी जपून वापरण्याकडे तरुणांचा कल होता. काही ठिकाणी कोरडी होळी साजरी करण्यात आली.
ठाण्यातील ३५ तरुणांच्या एका गटाने बदलापूर येथील ‘संगोपिता’ या गतिमंद मुलांच्या आश्रमात जाऊन होळी साजरी केली. या उपक्रमामध्ये ठाणे, कल्याण, डोंबिवलीतल्या तरुणांनी सहभाग घेतला होता. या तरुणांनी येथील विद्यार्थासाठी भेटवस्तू देऊन होळीचा आनंद साजरा केला. रविवारचा पूर्ण दिवस हे तरुण या विद्यार्थासह होळी खेळत होते. अस्मिता कांबळे आणि अश्विनी सूर्यवंशी या दोन तरुणींनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता. आश्रमातील मुलांनीदेखील त्यांना स्वत: काढलेल्या चित्रांची भेट देत अनोखी होळी साजरी केली.
कल्याणमधील बिर्ला कॉलेज परिसरातील सद्गुरू उत्सव समिती, कोकण वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, राजगर्जना मित्र मंडळ या मंडळींनी गारपीटग्रस्तांना मदत करणाऱ्या उपक्रमाची सुरुवात होळीच्या निमित्ताने कल्याणमध्ये केली असून एका दिवसांमध्ये त्यांनी सुमारे २५० किलो खत जमा केले आहे.
पुढील पंधरा दिवस कल्याणमध्ये त्यांचा हा उपक्रम सुरू राहणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल असे खत जमा करून त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा या मंडळींचा संकल्प असून यंदाची होळी सामाजिक बांधीलकी जपणारी असेल, असा प्रयत्न या मंडळींनी केला आहे. अशी माहिती मंडळाचे साकेत डामरे यांनी दिली.

Story img Loader