होळीपासून थेट रंगपंचमीपर्यंतचा काळ हा उत्साहाचा, रंगांचा काळ. चेष्टामस्करी, गंमतजंमत आदींची मर्यादा वाढविण्याचा हा काळ. एखाद्याचे चांगले कपडे रंगाने कुणी माखून टाकले तरी त्याला हसून माफ करण्याचे हे दिवस. यंदा मात्र ‘आपली सहनशक्ती फार ताणू नका’, असे आवाहन करण्याची परिस्थिती आहे. निम्मा महाराष्ट्र आणि देशाचाही बराच मोठा भूभाग दुष्काळात होरपळून निघतो आहे. वरुणराजा वेळेवर बरसला तरीसुद्धा आणखी किमान तीन महिने या परिसरातील जनतेचा घसा सुकलेलाच राहणार आहे. आंघोळ, कपडे-भांडी आदींसाठी सोडाच; साधे पिण्याचे पाणीसुद्धा अनेक गावांमध्ये १०-१५ दिवसांतून एकदा जेमतेम मिळते आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई-ठाण्यात सध्या मुबलक पाणी असले तरी ते ‘कुणाच्या तरी तोंडचे पळवलेले’ पाणी आहे हे लक्षात ठेवायला हवे. दुसरे असे की आपलेच कोटय़वधी बांधव पाण्यासाठी रानोमाळ हिंडत असताना आपण एक थेंबसुद्धा पाणी वाया घालवणे हा क्रूरपणाच आहे. त्यामुळेच ‘आपण तर धुळवडीला पाणी वापरणार नाहीच; अन्य कोणी वापरत असेल तर तेसुद्धा सहन करणार नाही.’ असा रोखठोक बाणा या होळीला अंगी बाणवा!