विविध इंग्रजी चित्रकथांवर आधारित चित्रपटांची सध्या रेलचेल आहे. त्यातच अनेक चित्रकथांवरील चित्रपटांची घोषणाही हॉलीवूडच्या बडय़ा बॅनर्सनी केली आहे. याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगार सक्रिय झाले असून त्यांनी त्या चित्रकथांच्या नावांचा वापर करून फसवी संकेतस्थळं तयार केली आहेत. ही संकेतस्थळं सुरू केली की त्या माध्यमातून व्हायरस आपल्या संगणकात शिरतो आणि आपली माहिती पळवून नेतो.
हॉलीवूडमधील बडय़ा चित्रपटनिर्मिती कंपन्यांनी नवनवीन चित्रपटांची घोषणा केली आहे. अॅक्वामॅन हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर पुढील वर्षी म्हणजे २०१६च्या मार्चमध्ये सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टीस, नोव्हेंबरमध्ये डिस्नेतर्फे डॉक्टर स्ट्रेंज, तर मेमध्ये ह्य़ुज जॅकसन व्होल्व्हारिन अभिनीत चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांबाबत आणि चित्रकथांबाबत भारतीय मुलांमध्येही मोठी उत्सुकता आहे. यामुळे देशातील तरुण याची माहिती मिळवण्यासाठी सातत्याने इंटरनेटवर या नावाने शोध घेत असतात. याचाच फायदा सायबर हल्लेखोर घेतात आणि बनावट संकेतस्थळं बनवून त्या माध्यमातून संगणकामध्ये शिरून सर्व माहिती चोरून नेतात. मागच्या वर्षीही असे प्रकार घडले होते. त्यावेळेस सुपरमॅन ही व्यक्तिरेखा अव्वल होती. इंटेल सिक्युरिटीने या वर्षांतील हॉलीवूड पात्रांची नावे घोषित केली आहेत, ज्या माध्यमातून सायबर हल्लेखोर सक्रिय झाले आहेत. यामध्ये अॅक्वामॅन हा सर्वात आघाडीवर असून त्याखालोखाल आयर्न फिस्ट, वोल्वोरिन, वंडर वुमन, डॉक्टर स्ट्रेंज, डेअरडेव्हिल, टाय : दि इन्क्रेडिबल हल्क, आयर्न मॅन, कॅटवुमन, ग्रीन लेन्टर्न, बॅटमॅन या पात्रांचा समावेश आहे. या पात्रांसह अन्य पात्रांच्या नावाने आपण इंटरनेटवर सर्च केल्यास आपल्याला त्या नावाची शेकडो संकेतस्थळे समोर येतात. यापैकी अधिकृत संकेतस्थळे आपल्याला माहिती नसल्याने अनेकदा आपण फसतो आणि पहिल्या क्रमांकावरचे किंवा ज्यामध्ये अधिक माहिती आहे अशा संकेतस्थळांची निवड करतो. जर ते बनावट संकेतस्थळ असेल तर त्या माध्यमातून स्पायवेअर, अॅडवेअर, स्पॅम, फिशिंग, व्हायरसेस अशा विविध मालवेर्सचा धोका निर्माण होतो. या मालवेर्सनी एकदा आपल्या संगणकामध्ये प्रवेश केला की ते सतत आपली माहिती चोरत राहतात, असे निरीक्षण इंटेल सिक्युरिटीजने नोंदविले आहे.
याबाबत काय काळजी घ्याल याचा तपशील इंटेलचे सायबर सुरक्षातज्ज्ञ रॉबर्ट सिसिलिआनो यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिला आहे. यातील काही महत्त्वाचे मुद्दे
* आपल्याला मोफत लिंक्सच्या माध्यमातून अधिक आकर्षक किंवा चांगली माहिती मिळत असेल तर त्या संकेतस्थळापासून सावध राहा.
* कोणतेही संकेतस्थळ सुरू करण्यापूर्वी किंवा संकेतस्थळावरील एखादी लिंक सुरू करण्यापूर्वी काळजी घ्या.
* आपण शोधत असलेल्या माहितीच्या स्पेलिंगमधील एखाद्या अद्याक्षराचा फरक असेल तरी ते संकेतस्थळ पाहू नका.
* अशा व्हायरसेसपासून वाचण्यासाठी अँटीव्हायरस अपडेट ठेवा आणि सुरक्षित शोध टूलचा वापर करून घातक शोध निकालांपासून बचाव करा.