अंधश्रद्धा निर्मूलनासह प्रबोधनाची चळवळ खंबीरपणे पुढे चालवत ठेवणे आणि जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करणे हीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना कृतिशील श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत येथील ऐतिहासिक बिंदू चौकात मंगळवारी झालेल्या शोकसभेत डॉ. दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
विचारांशी विचाराने लढाई करण्यात हार येत असल्यामुळे डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली, असे मत ज्येष्ठ लेखक राजा शिरगुप्पी यांनी व्यक्त केले. योगतज्ज्ञ डॉ. धनंजय मुंडे म्हणाले, धान्यापासून दारू तयार करण्यास विरोध करण्यासाठी जी व्यापक मोहीम डॉ. दाभोलकर यांनी राबवली. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्यासमवेत मी सहभागी झालो होतो. संयमी, अभ्यासू, समन्वयी नेतृत्वाची हत्या ही दुर्दैवी आहे.     
शोकसभेत ‘आम आदमी पक्षा’चे जिल्हाध्यक्ष नारायण पवार, दलित महासंघाचे प्रा.मच्िंछद्र सकटे, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, अ‍ॅड. शहाजी कांबळे, चित्रकार मिलिंद यादव, सुटाचे प्रा. आनंदा जरग, प्रा. कविता पाटील, ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई, कॉ. चंद्रकांत यादव, उत्तम कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
सांगलीत श्रद्धांजली
सांगली – पुरोगामी चळवळीचे कट्टर पुरस्कत्रे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सांगलीत आज धिक्कार करण्यात आला. महात्मा गांधी पुतळय़ाजवळ चळवळीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहून अंधश्रद्धा चळवळ अधिक जोमाने सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्याचे वृत्त समजताच सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात आली. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात दडपशाहीने विचारच खुडून टाकण्याचा प्रयत्न निषेधार्ह असल्याचे मत श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आले. या वेळी माजी आमदार शरद पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. कैलास पाटील, यांच्यासह मान्यवरांनी डॉ. दाभोलकर यांचा खून करणा-या शक्तींचा शासनाने त्वरित शोध लावावा आणि हल्लेखोरांना जबर शिक्षा व्हावी असे मत व्यक्त केले.
पुरोगामी विचारसरणीवर हल्ला – शशिकांत शिंदे
वाई – पुरोगामी विचारसरणीवर हा हल्ला आहे. हे कृत्य निंदनिय आहे. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनात केलेले काम व त्याचे बिल पास व्हावे यासाठी सर्वानी एकत्रितरीत्या प्रयत्न करावेत ही त्यांना श्रद्धांजली ठरेल.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले – जादूटोणा विरोधातील विधेयक प्रलंबित आहे. हा कायदा लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. या पुढे जाऊन त्यांनी गणपती उत्सवात पर्यावरणाचा विचार ठेवला होता. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळून तसेच पर्यावरणाचा विचार करून यावर्षीपासून सातारा शहरात गणेशोत्सव होईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यांचे सामाजिक जनजागृतीचे काम अत्यंत महत्त्वाचे होते. ते काम, त्यांचे विचार सदैव मार्गदर्शक ठरतील.
किशोर बेडकीहाळ – भारतात १९४८ सालात म. गांधींना संपवण्यात आले. तीच वृत्ती स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कायम आहे हे समजून येते. विचारांशी विचारांची देवाण-घेवाण करता आली नाही की हिंसेने त्याला संपवण्याचे काम सुरू आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना संपवण्याचा हा प्रकार त्यातलाच आहे. भ्याड हल्ल्याचा निषेध करताना त्यांच्या कामांना, त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमांना आपण पुढे नेले पाहिजे.
पार्थ पोळके – डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे विचार दाबण्याचा हा प्रयत्न त्यांचे कार्तकर्ते हाणून पाडतील. डॉक्टरांचे विचार आमच्या मनात कायम आहेत.
अरुण गोडबोले – डॉ. दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरणाच्या चळवळीला त्यांच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यातील कार्यकर्ता वृत्तीने त्यांनी राज्यभर जनजागृतीची मोहीम अनेक कार्यकर्ते उभे करून चालवली. त्यांच्या जाण्याने कृतिशील विचारवंताला राज्य मुकले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा