महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तथा माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या २९ व्या स्मृतिदिनी कृष्णा – कोयना प्रीतिसंगमावरील समाधीस्थळावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सहकारी मंत्रिगण व यशवंतप्रेमी जनतेने आदरांजली वाहिली. दरवर्षी भावपूर्ण वातावरणात साजऱ्या होणाऱ्या चव्हाणसाहेबांच्या पुण्यस्मरणानिमित्त आदरांजलीच्या कार्यक्रमावर याखेपेस ऊसदरवाढ आंदोलनाच्या तणावाचे ढग दाटून होते. परिणामी यशवंतरावांच्या समाधीस्थळी कमालीचा चोख बंदोबस्त राहताना, मान्यवरांची ओळख परेड घेताना, झडतीही पोलिसांनी घेतली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ‘कराड बंद’ला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला.
यशवंतराव चव्हाणांचे राजकीय वारसदार मानले गेलेले केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची अनुपस्थिती प्रकर्षांने जाणवली गेली. महाराष्ट्राच्या या लाडक्या नेत्याला स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी श्रध्दांजली वाहिल्यानंतर राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, साताऱ्याचे पालकमंत्री शशिकांत शिंदे, पशुसंवर्धनमंत्री मधुकरराव चव्हाण, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ, खासदार उदयनराजे भोसले, आमदार प्रभाकर घार्गे, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, विक्रमसिंह पाटणकर, डॉ. अतुल भोसले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप येळगावकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा पाटील, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, कराड पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांच्यासह महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून ‘यशवंत निष्ठां’ची मोठी वर्दळ होती.
समाधीस्थळी असलेल्या पर्णकुटी समोरील हिरवळीत सकाळपासूनच भक्तिगीतांचे गायन, संगीत तसेच शब्दसुरांची आदरांजली सुरू होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राजकीय क्षेत्राबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समाधीला पुष्पांजली वाहिल्यानंतर हिरवळीवर बसून या सुश्राव्य गायनाचा व संगीताचा आनंद लुटला. यावेळी सारे श्रोतेजन मंत्रमुग्ध झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईहून आलेल्या ‘यशवंत समता ज्योती’चे स्वागत करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा