जमात-ए इस्लामी हिंदचा महिला विभाग व गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशनच्या वतीने सदर येथील मुस्लिम लायब्ररीत ‘बेटी का मान-मानवता की शान’ अंतर्गत महिलांची दशा व सुरक्षेवर आधारित एक कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात रजिया बेगम यांनी पवित्र कुरआनच्या काही ओळीच्या पठनाने केली. त्यानंतर जमाअते इस्लामी हिंद व गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशनबद्दल साजिदा परवीन व जेबा खान यांनी माहिती दिली. सद्यस्थितीत महिलांच्या सुरक्षेबाबबत जागरूक राहणे आवश्यक असल्याचे मत डॉ. प्रतिभा महातो यांनी याप्रसंगी व्यक्त केले. महिलांचा मान-सन्मान करण्याची सुरुवात प्रथम आपल्या घरातूनच करायला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. शाजिया खान यांनी नैतिक पतनामुळे होणारी हानी यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या,  आपल्या मुलांच्या प्रशिक्षणावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना बरेवाईटाचा फरक जाणवू शकेल. नंदा भगत यांनी  महिलांच्या स्वातंत्र्याबाबत चिंता व्यक्त केली, तर कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी शीला मोहोड यांनी मुलींच्या घर आणि घराबाहेरील सन्मानावर भर दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष जुलेखा बुशरा यांनी म्हटले की, महिला पडद्याच्या स्वरूपात इस्लामच्या छायेत सुरक्षित राहू शकतात. आपण आपल्या मुलींच्या शाळा-महाविद्यालयातील वर्तनावर तसेच त्यांच्या इंटरनेट व मोबाईलच्या वापरावर सूक्ष्म निरीक्षण ठेवले पाहिजे. आपल्याला सर्वप्रथम घरच्या दिव्याला प्रज्वलित करावे लागेल, तेव्हाच जग प्रकाशमय होईल, असे मत त्यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. डॉ. सबीहा खान यांनीही आपले विचार व्यक्त केले. त्यांनी पीपीटीच्या माध्यमातून जमाअते इस्लामी हिंदच्या वतीने प्रस्तावित ११ उपाय सांगितले. त्यानुसार विवाह योग्य वयोमर्यादेत व्हावे, बलात्कारासारख्या दुष्कृत्यासाठी कठोर शिक्षा व्हावी, संयुक्त शिक्षणाला संपुष्टात आणावे, शाळा व महाविद्यालयात परिपूर्ण परिधान कायस्वरूपी करावे, सामाजिक कल्याण व युवकांमध्ये नैतिकतेला प्रोत्साहन देण्यात यावे, शहरातील महिलांचे अवागमनाचे मार्ग सुरक्षित करण्यात यावे, विवाहप्रसंगी हुंडाप्रथा बंद करण्यात यावी, जाहिरातीमध्ये महिलांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी, मद्यपानावर आळा घालण्यात यावा इत्यादी उपाय सुचवले. कार्यक्रमात मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन कायनात खान यांनी केले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा