सोलापुरात डॉक्टरला मारहाण करणारे पोलीस निरीक्षक अरुण वायकर व शिपायांवर तात्काळ निलंबनाची कारवाई, तर विदर्भात राष्ट्रवादीच्या कामगार नेत्याला मारहाण करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे यांची झालेली बदली या दोन्ही घटनांमध्ये सारखा न्याय झालेला नाही. पश्चिम महाराष्ट्र हा आईचा आणि विदर्भ हा सावत्र आईचा अशी भेदभावपूर्ण कारवाई राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केल्याची खंत आता राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच व्यक्त करीत आहेत.
भद्रावती तालुक्यातील बरांज येथील कर्नाटक एम्टा कोळसा खाणीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत कामगार संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले होते. स्थानिक भूमिपुत्र मराठी कामगारांचे हे आंदोलन दडपण्यासाठी वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे यांनी खाण व्यवस्थापनाची बाजू घेत सर्व कामगारांना अटक केली होती. त्याच दरम्यान कामगार नेते प्रमोद मोहोड यांना भद्रावती पोलीस ठाण्यात अमानुष मारहाण केली. या मारहाणीचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसने चंद्रपूर बंद पाळला तर युवक राष्ट्रवादीने बेमुदत उपोषण केले. गावडे व जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्या निलंबन व बदलीसाठी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची गोंदिया येथे भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादीच्या कामगार नेत्याला पोलीस अधिकारी मारहाण करीत असल्याची चित्रफितच दाखविण्यात आली. त्यावर केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी स्वत: चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला दिले. त्यानुसार गावडे यांच्यावर निलंबनाच्या कारवाईऐवजी अकोला जिल्हय़ातील बाळापूर येथे बदली करण्यात आली. तर जैन यांच्यावर मेहर नजर दाखवित त्यांना येथेच कायम ठेवण्यात आले आहे.
दुसरीकडे सोलापूर येथे पोलीस निरीक्षक अरुण वायकर, शिपाई चौगुले, ऑपरेटर सुरवसे यांनी एका डॉक्टरला बेदम मारहाण केली. या संपूर्ण मारहाणीचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद होताच सर्व प्रसार माध्यमातून दाखविण्यात आले. एका डॉक्टरला पोलीस अधिकारी मारहाण करीत असल्याचे बघून राज्यातील डॉक्टरांच्या वैद्यकीय संघटनेने एकत्र येऊन संप पुकारला. त्याचा परिणाम राज्यातील सर्व जिल्हा, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सेवा ठप्प झाली. डॉक्टरच्या मारहाण प्रकरणाची तात्काळ दखल घेत राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी पोलीस निरीक्षक वायकर, शिपाई चौगुले व ऑपरेटर सुरवसे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली. या एका प्रकरणातून राज्यकर्ते पश्चिम महाराष्ट्रासोबत आईचा आणि विदर्भासोबत सावत्र आईचा व्यवहार करीत असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. कामगार नेते मोहोड यांना मारहाण करणारे गावडे यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री असो की प्रदेश पातळीवरील नेत्यांना विदर्भाशी काही देणे घेणे नाही हेच या निमित्ताने समोर आले आहे.
राष्ट्रवादीच्याच नेत्याला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची तक्रार पक्षाचे कार्यकर्ते करीत असले आणि एखाद्या अधिकारी चुकत असल्यास त्याची बदली व निलंबनाची मागणी करीत असेल तर त्यात गैर काय? असा प्रश्न आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नेतेच करीत आहेत. तिकडे सोलापुरात घडलेला प्रकार हा अशोभनीय असला तरी पश्चिम महाराष्ट्रातील घटनेची तात्काळ दखल घेतली जात असल्याचे यानिमित्ताने पुन्हा दिसून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असो की काँग्रेस, शिवसेना व भाजपसुद्धा सर्व राजकीय पक्ष नेहमीच विदर्भाला सावत्र वागणूक देत आले आहेत. मात्र मारहाण प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना सुध्दा जाणून घेतल्या नाही, अशी खंत आता राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारीच व्यक्त करीत आहेत. आम्ही पक्षासाठी रक्ताचे पाणी करायचे आणि नेत्यांनी मात्र आमच्या मागणीची साधी दखल सुध्दा घ्यायची नाही, अशा पक्षाचे काम तरी कशाला करायचे? अशीही भावना या पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. एकूणच सोलापूर प्रकरणात गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केलेला भेदभाव स्पष्टपणे समोर आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा