होमिओपॅथिक डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी सुरू केलेले साखळी उपोषण सोमवारी चौथ्या दिवशीही सुरूच होते.
होमिओपॅथिक डॉक्टरांनी शुक्रवारपासून बेमुदत दवाखाना बंद आंदोलन सुरू केले आहे. होमिओपॅथिक डॉक्टर्स अन्याय निवारण संघर्ष समितीच्या वतीने येथे विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनादरम्यान शनिवारी डॉक्टरांनी रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या २५ डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली होती. उपोषण स्थळापासून रस्त्यावर येत डॉक्टरांनी हे आंदोलन केल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. डॉ. संदीप नरवाडकर, डॉ. गजानन पाटील, डॉ. विनोद मंत्री, डॉ. सुनील जाधव, डॉ. दिगांबर डोरनपल्ले, कपील काळे आदींसह काही डॉक्टरांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला. यानंतर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन देण्यात आले. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हे नोंदवून अटक करणे चुकीचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. डॉक्टरांना केलेल्या अटकेचा भाजप शहराध्यक्ष अजय गव्हाणे, गजानन लव्हाळे, दिनेश नरवाडकर, वैजनाथ कदम, रामप्रसाद डोंबे आदींनी निषेध केला. सोमवारी चौथ्या दिवशी साखळी उपोषण सुरूच होते.

Story img Loader