कुठे अन्नदान, कुठे मेणबत्ती फेरी तर कुठे व्याख्यान, अशा विविध मार्गानी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने नाशिकमध्ये बुधवारी मध्यरात्री काळाराम मंदिर ते शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मेणबत्ती फेरी काढून अभिवादन करण्यात आले. या फेरीचे नेतृत्व भय्यासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष भगवान बच्छाव, महासभेचे शहराध्यक्ष किशोर बच्छाव यांनी केले. इंदू मिलची जागा राष्ट्रीय स्मारकासाठी देण्याचे जाहीर करण्यात आल्याचा आनंदोत्सवही पार पडला.
जिल्हा परिषदेच्या वतीने रावसाहेब थोरात सभागृहात अभिवादन सभा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित कुमार झा होते. प्रारंभी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य अतिरिक्त महासचिव करूणासागर पगारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष एकनाथ मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रथम सत्रात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठीचे योगदान’ या विषयावर भगवान बच्छाव यांचे तर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्मचारी विषयक धोरण’ विषयावर करुणासागर पगारे यांचे व ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तीमत्व’ विषयावर पी. व्ही. बनसोडे यांचे व्याख्यान झाले. प्रास्तविक बाळासाहेब टिळे, सूत्रसंचालन उदय लोखंडे यांनी केले. आभार आर. पी. आहेर यांनी मानले.
विविध सामाजिक संघटनांच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत शिवाजी रोडवरील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जमून अभिवादन केले. अध्यक्षस्थानी अॅड. एन. एस. बनसोडे उपस्थित होते. प्रास्ताविक अविनाश आहेर यांनी केले. बाबासाहेबांच्या जीवनकार्याविषयी राहुल तुपलोंढे, राजू रायमले, सुभाष मुंढे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मुश्ताक शेख यांनी केले. आभार मोहन जगताप यांनी मानले. यावेळी सामूहिक धम्मवंदनाही घेण्यात आली. नाशिक येथील विक्रीकर कार्यालयातही सहआयुक्त एस. पी. काले यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन कार्यक्रम झाला. एचपीटी महाविद्यालयातील पत्रकारिता विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थ्यांविषयी विचार’ विषयावर उत्तमराव सोनकांबळे यांचे व्याख्यान झाले.
मनमाड येथेही मेणबत्ती फेरी काढण्यात आली. तसेच अन्नदान करण्यात आले. बुधवारी मध्यरात्रीपासूनच बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ विविध पक्ष, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करणे सुरू केले होते. बौध्दजन उपासक संघातर्फे सकाळी वंदनेचा सामुहिक कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष बी. एन. बनकर होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा