अमर वझलवार यांचे जीवन समाजासाठी एक आदर्शच होय. विदर्भाच्या विकासासाठी नि:स्वार्थपणे झटणारे, दुसऱ्यांच्या सुखात सुख आणि दु:खातदु:ख मानणारे असे साधे समाधानी जीवन जगणारे, नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करणारे अमर वझलवार हे विदर्भासाठी गौरवास्पद असे व्यक्तिमत्त्व आहे, असे उद्गार माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांनी काढले.
कुसुमताई वानखेडे सभागृह येथे अमर वझलवार यांचा सत्तरीपूर्ती सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी माजी खासदार बनवारीलाल पुरोहित उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी हास्यकवी मधुप पांडे उपस्थित होते. अमर वझलवार यांचा शाल-श्रीफळ, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पत्नी वैजयंती वझलवार यांचादेखील सत्कार करण्यात आला.
वझलवार यांचा सत्कार करणे म्हणजे आपल्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण असून हा सत्कार म्हणजे त्याग आणि तपस्येची पावती होय, असेही बनवारीलाल पुरोहित म्हणाले. यावेळी मधुप पांडे म्हणाले की, अमर वझलवार यांचे जीवन शालिनता, शिष्टता, मधुरता याने परिपूर्ण असून ते नि:स्वार्थपणे दुसऱ्यांसाठी झटत राहिले.
सत्कार समारंभाला उत्तर देताना अमर वझलवार म्हणाले, मी सामान्य माणूस असून मोठा नेता नाही. मी फक्त आत्मविश्वासाने काम केलेय त्यात कधी स्वार्थ बघितला नाही. मी जे काम केले त्याला नेहमी लोकांचे सहकार्य लाभले. त्यामुळे माझ्या कामाचे श्रेय माझ्या एकटय़ाचे नसून ते सर्वाचे आहे. कार्यक्रमाचे संचालन हेमांगी राठी यांनी केले तर सुधीर देशपांडे यांनी आभार मानले. मधुकर आपटे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. श्रीकांत डोईफोडे, अरुण नगरकर, डॉ. सुरेश चांडक, अनंत कामठीकर आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा