समाजात वैशिष्टय़पूर्ण सेवा करणाऱ्या व्यक्तींना रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थच्या वतीने ‘व्यावसायिक सेवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. ज्ञानदेव चोपडे, डॉ. शिल्पा देशपांडे, गणेश सूर्यवंशी यांना विद्याताई फडके यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह व मानपत्र देण्यात आले. डॉ. चोपडे यांना बहुविकलांगत्वांच्या सेवेसाठी, डॉ. शिल्पा देशपांडे यांना कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या सर्वागीण प्रगतीसाठी तर गणेश सूर्यवंशी यांना मनोरुग्णांच्या सेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आला. मनोगत व्यक्त करताना डॉ. चोपडे यांनी डाऊन सिंड्रोम या आजाराबद्दल माहिती दिली. डॉ. देशपांडे यांनी माई लेले शिक्षण संस्थेबद्दल माहिती देऊन पुरस्काराने गौरव म्हणजे पुढील कार्यासाठी प्रेरणा आहे, असे सांगून पुरस्कार सर्व कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या वतीने व संचालक मंडळाच्या वतीने स्वीकारला. गणेश सूर्यवंशी यांनी तर घरातच मनोरुग्ण असल्यामुळे त्यांचे संगोपन करीत असताना समाजातील इतरही मनोरुग्णांच्या संगोपनाची जबाबदारी उचलली व त्या प्रेरणेतूनच श्री सिद्धी विनायक पुनर्वसन शिक्षण संस्था उभारल्याचे सांगितले. प्रमुख पाहुण्या विद्याताई फडके यांनी रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थच्या या सोहळ्याबद्दल गौरवोद्गार काढले. अनेक सन्मान सोहळे बघितले पण समाजातील निवडक अशा कार्यतत्पर व्यक्ती शोधून त्यांचा सन्मान केल्याबद्दल रोटरी क्लबचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, सचिव किरण सागोरे व दीपक शहा उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा