मंत्रालयाला आग लागली. चौथ्या, पाचव्या, सहाव्या अशा वरच्या मजल्यांपर्यंत आग फोफावत गेली. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर ध्वजस्तंभ सांभाळणाऱ्या चमूचे कार्यालय आहे. आग फोफावणार हे ओळखून ध्वजस्तंभ कर्मचारी राजेंद्र कानडे आणि त्यांचे सात सहकारी अशा आठ जणांनी स्वत:चे जीव धोक्यात घालून तिरंग्याचे रक्षण केले. राजशिष्टाचाराच्या नियमांनुसार आदेश आल्याशिवाय सूर्यास्तापूर्वी ध्वज उतरविता येत नाही. अखेर मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव कार्यालयांकडून आदेश आले. तोपर्यंत आग आणखी भडकली होती. परंतु, कानडे आणि त्यांचे सहकारी विशाल राणे, डी. डब्ल्यू. अडसूळ, एस. जे. जाधव, पी. जी. रोज, जी. एस. मुंज आणि पी. डी. केंडळे अशा आठ जणांनी आगीचा दाह सोसत तिरंगा उतरवून व्यवस्थित घडी करून जागी ठेवला. खरी झुंज त्यानंतरच होती. आग सहाव्या मजल्यापर्यंत भडकली असताना सातव्या मजल्यावरून खाली येण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व आठ जणांना सुरक्षित खाली उतरविले. तिरंग्याचे रक्षण करणाऱ्या या आठ जणांना गॉडफ्रे फिलिप्स शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
नि:स्वार्थीपणे काम करणाऱ्या संस्था, वैयक्तिक धाडस करून अन्य व्यक्तींचे जीव वाचविण्याची कामगिरी बजावणाऱ्या व्यक्ती यांना दरवर्षी गॉडफ्रे फिलिप्स शौर्य पुरस्कार दिले जातात. यंदाचे या पुरस्कारांचे २१ वे वर्ष आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गोवा राज्यांतील सर्वसामान्य व्यक्तींनी केलेल्या असामान्य कर्तृत्वाचा गौरव करून त्यांना लोकांसमोर आणण्याचे काम शौर्य पुरस्कार देऊन केले जाते. यंदाही चारूदत्त जाधव, देवाजी तोफा, वासुदेव नाईक, अनुप एम, दिवंगत मायकल डिसूझा, मॅथ्यू, उमा प्रेमन, टी. राजा या व्यक्ती तसेच मुंबईतील ‘हेल्पर्स ऑफ हॅण्डीकॅप्ड’, गोव्यातील ‘अ‍ॅनिमल वेल्फेअर ट्रस्ट’ या संस्थांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर कर्नाटकातील बेलतंगडी तालुक्यातील लैला ग्रामपंचायतीला अमोदिनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अल्लेपीस्थित अनुप एम. या पंधरा वर्षांच्या मुलाने आपला जीव धोक्यात घालून १५ फूट खोल पाण्यात पडलेल्या लहान मुलीचे प्राण वाचविले. त्याला पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कारही मिळाला आहे. ७९ वर्षांचे मॅथ्यू यांनी विहिरीत पडलेल्या अडीच वर्षांच्या मुलाचे प्राण वाचविले. तर पणजीस्थित वासुदेव नाईक यांनी भर पावसात नदीमध्ये पडून गटांगळ्या खाणारे नौदलातील अधिकाऱ्याचे प्राण वाचविले.
वयाच्या १३ वर्षी दृष्टिहीन झालेल्या चारूदत्त जाधव यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी ठरणारे आहे. दृष्टिहीन झाल्यानंतरही शिक्षणाची आवड आणि जिद्द या जोरावर एमबीएपर्यंत शिकलेले चारूदत्त जाधव बुद्धिबळपटूही आहेत. माहिती-तंत्रज्ञानातील शिक्षणाच्या जोरावर त्यांनी अंधांसाठी ‘टॉक ६४’ हा बुद्धिबळ प्रशिक्षण कार्यक्रम आणि गेम सॉफ्टवेअर तयार केले. एवढेच नव्हे तर ग्लोबल चेस ही ऑनलाईन डिजिटल लायब्ररी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्याशिवाय अंधत्वावर मात करीत १९९२ साली चारुदत्त जाधव यांनी १७,२२० फूट उंचीवरील हिमालयातील क्षितीधर शिखर पादाक्रांत केले. अंधत्वाचे भांडवल न करता स्वत:चे व्यक्तिमत्व असामान्य बनविणारे चारुदत्त जाधव यांनी आपल्यासारख्या अंध व्यक्तींनाही बुध्दिबळ खेळता यावे या एकाच ध्यासाने सॉफ्टवेअर तयार केले.
गडचिरोली जिल्ह्यातील देवाजी तोफा यांनी आपल्या ग्रामस्थांना १८०६ एकर वनजमीन राखण्याचा हक्क मिळवून दिला. बांबूपासून बनविलेल्या वस्तू विकण्याची परवानगी मिळवून दिली आणि त्यातून ४०० गावक ऱ्यांना उपजीविकेचे मोठे साधन मिळवून दिले.  कर्नाटकातील बेलतंगडी तालुक्यातील लैला ग्रामपंचायतीने महिलांच्या स्वच्छतेसाठी उपक्रम राबविले. एवढेच नव्हे तर पूर्णत: विघटन होणारे लाकडाच्या लगद्यापासून तयार केलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सचा उद्योग उभारला. ग्रामीण भागातील महिला, तरुणी तसेच शाळकरी मुलींमध्ये स्वच्छतेचा प्रसार करून आदर्श घालून दिला. या अलौकिक कार्याबद्दल लैला ग्रामपंचायतीला गॉडफ्रे फिलिप्सतर्फे अमोदिनी हा महिलांसाठीच्या कार्यासाठी दिला जाणार विशेष पुरस्कार देऊन गौरविले.

Story img Loader