कर्जत येथील मायमुहूर्ताब देवीला तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीच्या दस-याच्या सीमोल्लंघनामध्ये पहिला मान असून, त्यासाठी बुधवारी पाचव्या माळेला येथून देवीचे प्रस्थान झाले. या वेळी मोठय़ा प्रमाणावर भाविक उपस्थित होते. जिल्हय़ातील कर्जत व बुऱ्हाणनगर या दोन देवींना तुळजापूरला स्ीामोल्लंघनाचा मान आहे.
तुळजापूर येथील तुळजाभवानी कर्जत येथील अंबादास क्षीरसागर यांच्या पूर्वजांच्या घरी अनेक दिवस राहिली. येथेच ती मोठी झाली. तिचे नाव अंबिका असेही ठेवले होते, मात्र एक दिवस मोठी झाल्यावर तिने तिचे खरे रूप दाखवले व अंतर्धान पावली व प्रत्येक दस-याच्या दिवशी तुळजापूरला सीमोल्लंघनाला येण्याचे निमत्रंण दिले अशी आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून मायमुहूर्ताब देवीची काठी तुळजापूरला जाते.
बुधवारी कापरेवाडी वेशीतील देवीच्या मंदिरातून या काठय़ांचे दुपारी साडेबारा वाजता प्रस्थान झाले. देवीचा मुखवटा एका काठीस बांधला जातो. त्याची शहरातून मिरवणूक काढण्यात येते. या वेळी अराध्यांचा मोठा मेळा जमतो. हे सर्व जण पोत खेळत व देवीचे  खेळणे नाचवत देवीचा जोगवा मागत असतात. या वेळी या काठीचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.
तुळजापूर येथे दस-याच्या सीमोल्लंघन मिरवणुकीत अग्रभागी राहण्याचा मान कर्जतच्या या मायमुहूर्तबा देवीला आहे. तुळजापूरला कर्जतच्या देवीचे आगमन होताच शुक्रवार पेठेमध्ये उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सामोरे जातात व तिथे त्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून नंतर मिरवणुकीने तुळजाभवानी मंदिराकडे कर्जतच्या देवीला नेण्यात येते. तेथे मंदिराबाहेर देवी थांबते. सीमोल्लंघनानंतर जिल्हाधिका-यांच्या हस्ते अंबादास क्षीरसागर यांचा देवीचा मान म्हणून संपूर्ण पोषाख देऊन सत्कार करण्यात येतो. नंतर देवी कर्जतकडे परतीच्या प्रवासाला निघते.  
कर्जत येथून देवी अंबादास क्षीरसागर नेतात, तर दिवटीचा मान राम सुतार यांना आहे. पाचव्या माळेला देवीचे प्रस्थान करताना होणा-या आरतीचा मान सचिन कुलथे यांना व भोगीचा मान शिवानंद पोटरे यांना आहे. तर नवरात्रामध्ये रोज मंदिरामध्ये होणा-या आरती म्हणण्याचा मान महामुनी यांच्या घराण्याकडे आहे.