महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने संयुक्तपणे आयोजित केलेल्या लघुपट स्पध्रेच्या व्यावसायिक गटात कोल्हापूरच्या गहिवर फाऊंडेशनची निर्मिती असलेल्या व मयूर कुलकर्णी यांची संकल्पना-दिग्दर्शन असलेल्या ‘भवताल’ या लघुपटाला एक लाख रुपये व सन्मानचिन्ह अशा पुरस्कारासह गौरवण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
लघुपटाची लांबी अवघी साडेसात मिनिटांची आहे. इतक्या कमी अवधीत निसर्ग आणि मानव यांच्यातलं तुटत चाललेलं नातं आणि भवतालाचा सुटत चाललेला तोल याविषयी खूप काही सांगण्यात ‘भवताल’ यशस्वी झाला आहे आणि म्हणूनच या लघुपटाला दाद मिळते आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर या लघुपटाविषयी मयूर कुलकर्णी म्हणाले, व्यक्ती आणि घटना असणाऱ्या कथांमधून नाटय़ शोधून ते मांडण्यापेक्षा आज निसर्ग आणि मानवी जीवन यांच्या संघर्षांतून जे महानाटय़ अनुभवाला येतंय तेच मला लघुपटातून मांडावंसं वाटलं. या महानाटय़ाला दाद मिळते आहे याचाच अर्थ मला जे लघुपटातून पोहोचवायचं आहे ते पोहोचतं आहे आणि पुरस्कारापेक्षा त्याचंच समाधान अधिक आहे.
भवतालची निर्मिती करणाऱ्या गहिवर फाऊंडेशनविषयी विचारले असता कुलकर्णी म्हणाले, गहिवर हा कोल्हापुरातील पर्यावरणविषयक आस्था असणाऱ्या काही तरुण, उत्साही मंडळींनी एकत्र येऊन तयार केलेला गट आहे. मदतीसाठी कुणाकडे हात न पसरता आपल्या पातळीवर, आपल्याला जे करता येईल ते करायचं ही आमची कामाची पद्धत आहे. यातूनच माळढोक समर्थनासाठीच्या प्रयत्नांना ‘गहिवर’कडून जसा हातभार मिळाला, त्याचप्रमाणे गेली तीन वर्षे जागतिक पर्यावरणदिनी सर्वासाठी खुला प्रवेश ठेवून काही वेगळे पर्यावरणविषयक लघुपट, माहितीपट किंवा चित्रपट दाखवणे हेही गहिवर फाऊंडेशन करीत आले आहे.
‘एॅडवेडिझाइन स्टुडिओ’च्या माध्यमातून कमíशअल आर्टस्टि म्हणून सर्वाना माहिती असलेल्या मयूर कुलकर्णी यांनी चित्रपट माध्यम व पर्यावरणविषयक प्रेमातून ‘भवताल’ नावाचा लघुपट निर्माण केला. हा लघुपट जसा गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या लघुपट विभागात प्रदíशत झाला, त्याचप्रमाणे जयपूर फेस्टिव्हल, ओरिसामधील फेस्टिव्हल, नाशिक व पुणे येथील फेस्टिव्हल्समध्येही त्याची दखल घेतली गेली होती. लघुपटासाठी संगीत शशांक पवार यांचे, छायाचित्रण सचिन सूर्यवंशी यांचे, तर संकलन निखिल ठक्कर यांचे आहे.
‘भवताल’चे संकल्पक व दिग्दर्शक मयूर कुलकर्णी हे कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्या संचालक मंडळाचेही सदस्य आहेत आणि त्यांनी कोल्हापुरातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या कॅटलॉगच्या कव्हरसाठी या वर्षी भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दीच्या निमित्ताने चलचित्राची जी वेगळी कल्पना आणली होती, तिला महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरूनही दाद मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा