शहरात कडक उन्हाळा तापायला सुरुवात झाली असून चंद्रपूर शहरात आज ४०.८ अंश सेल्शिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. एप्रिल व मे महिन्यात तापमानाचा पारा ४५ अंशावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केवळ चंद्रपूरच नाही, तर लगतच्या तालुक्यातील तापमानात सुध्दा वाढ झालेली आहे. औष्णिक वीज केंद्र व वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे या शहरातील तापमानात प्रचंड वाढ होत असल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे.
यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवडय़ातच तापमानाने  ४० अंश पार केले आहे. यावर्षी हिवाळ्याची थंडी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत कायम होती, परंतु मार्चच्या मध्यान्हापासून उन्हाळ्याची तीव्रता जाणवायला सुरुवात झालेली आहे. मार्च संपायला अजून दोन दिवसांचा अवधी शिल्लक असतांना उन्हाचा पारा ४०.८ अंश  सेल्शिअसवर पोहोचला आहे. चंद्रपूर कडक उन्हाळ्यासाठी देशभरात प्रसिध्द आहे. सध्याचे तापमान पाहू जाता यंदाही उन्हाचा पारा उन्हाळ्यातील एप्रिल व मे महिन्यात ४५ अंशाच्या वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचाच अर्थ, यंदाही कडक उन्हाळा जबर तापणार असल्याचे हवामान खात्यातील जाणकारांचे मत आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता आतापासूनच शीतपेय, आईस्क्रीम पार्लर्स, चौकाचौकात लस्सी सेंटर, ऊसाच्या रसांचे ठेले, थंड पाण्याची पाणपोई सुरू झालेली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असतांनाच रस्त्यांवरील दुपारची गर्दीही कमी होत आहे. दहावी व बारावीची परीक्षा आटोपल्याने रस्त्यांवरील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली असली तरी शाळकरी मुले व महाविद्यालयीन तरुण-तरुणींची गर्दीही कमी झाली आहे. दुपारी बारा वाजल्यानंतर उन्हामुळे रस्ते आतापासूनच ओस पडलेले दिसत आहेत. शहरातील बाजारपेठा थंडावल्या आहेत. उन्हामुळे घरोघरी कुलर, एसी व वातानुकुलित यंत्रणा सुरू झालेली बघायला मिळत आहे. शहरातील चौकात कुलरसाठी लागणारा खस व नव्या कुलरची दुकाने मोठय़ा प्रमाणात सुरू झालेली आहेत. वेकोलिच्या कोळसा खाणी, वीज केंद्र व पोलाद उद्योगांमुळे शहरात प्रदूषणासोबतच उन्हाची तीव्रता यावर्षी अधिक जाणवणार आहे. त्याला कारण शहरातील रस्त्यांचे काम सुरू असल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. त्यामुळे यावर्षी लोकांना तीव्र उन्हासोबत धुळीचाही त्रास सहन करावा लागणार आहे.

Story img Loader