* चंद्रपुरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ
* पोलिस व महापालिकेनेही मागवला अहवाल
वाहनतळ नसलेल्या शहरातील आठ मोठय़ा हॉटेल्सना जिल्हा प्रशासनाने ताळे ठोकले असून या सर्वाचे खाद्य परवाने अडवून ठेवल्याने हॉटेल व्यावसायिकांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही कारवाई एकतर्फी असल्याची ओरड होताच जिल्हा पोलिस अधीक्षक व महानगरपालिकेकडून वाहनतळ नसलेल्या हॉटेल्सचा सविस्तर अहवाल मागविला असून त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याने हॉटेल मालकात धडकी भरली आहे.
या शहरात भव्य गगनचुंबी हॉटेल्सच्या इमारती असल्या तरी त्याला वाहनतळ नाही, ही सर्वात मोठी समस्या आहे. आता नेमका हाच धागा पकडून जिल्हा प्रशासनाचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी हॉटेल व्यावसायिकांच्या विरोधात कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. जिल्हा परिषदेसमोरील रसराज या हॉटेलमध्ये वाहनतळाची व्यवस्था नसल्याने त्याचा खाद्य परवाना अडवून धरला आहे. खाद्य परवाना नसल्याने हॉटेलला जिल्हा प्रशासनाने कुलूप ठोकले आहे. केवळ हे एकच हॉटेल नाही, तर शहरातील आठ हॉटेल्सना वाहनतळ नसल्याचे कारण समोर करून ताळे ठोकण्यात आले आहेत.
यात सिव्हील लाईन प्रभागातील भागवत आर्केडमधील व्हेज जंक्शन, याच मार्गावरील सूजी फुड, बंगाली कॅम्पमधील संस्कृती, एंजॉय, परेराज, सुपरस्टार या हॉटेलला वाहनतळ नसल्याने त्यांनाही ताळे ठोकण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने वाहनतळाचे कारण समोर करून एकाच वेळी आठ हॉटेल बंद केल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
मात्र, ही कारवाई एकतर्फी असल्याची ओरड आता काही हॉटेल संचालकांनी दबक्या आवाजात सुरू केली आहे. शहरातील बहुतांश हॉटेलमध्ये पार्किंगची व्यवस्था नसतांना केवळ आठ हॉटेल्सवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली. त्यामुळे या आठ हॉटेल मालकांमध्ये प्रशासनाप्रती तीव्र नाराजी आहे. वाहनतळाच्या मुद्यावर जिल्हा प्रशासनाला कारवाई करायचीच होती तर सर्वावर समान कारवाई करायला हवी होती.
परंतु, कॅफे मद्रास, इंडियन कॅफे, गुलमर्ग, लि-शेफ, स्वाद, दीपक, हॉटेल करण, जगत, अनुजा बीअर बार, रणजित, रामनगर परिसरातील मनी बीअर बार, यंग रेस्टारंट, गणराज, गोल्डन, सितारा, शिदोरी रेस्टारंट, कौस्तूभ बार या हॉटेलला वाहनतळाची व्यवस्था नाही. मात्र, त्यांच्यावर प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही.
याचाच अर्थ, मर्जीतील हॉटेल व्यावसायिकांना सोडून ही कारवाई केली जात आहे. हॉटेलच्या नियमानुसार प्रत्येक हॉटेलला स्वत:ची पार्किंगची व्यवस्था हवी. मात्र, काही हॉटेल व्यावसायिकांनी तर दुसऱ्याच्या इमारतीची जागा ही स्वत:च्या हॉटेलची पार्किंगम्हणून दाखविली आहे. एका बीअर बार मालकाने तर स्वत:च्या हॉटेलची पार्किंग जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतीत दाखविली आहे. नागपूर मार्गावरील बहुतांश हॉटेलला वाहनतळाची व्यवस्था नाही, ही वस्तुस्थिती असतांना प्रशासनाने केवळ आठ हॉटेलवर कारवाई केल्याने व त्यांचे खाद्य परवाने अडवून धरण्यात आल्याने व्यावसायिकात तीव्र नाराजी आहे. हॉटेलसोबतच शहरातील बिल्डरांनी उभ्या केलेल्या एकाही    इमारतीला    वाहनतळ नाही. त्यापाठोपाठ शहरातील लहान मोठे हॉटेल    पार्किंग शिवाय उभे आहेत. यासोबतच डॉक्टरांच्या हॉस्पिटल्सच्या इमारतींनाही पार्किंगची व्यवस्था नाही. मात्र, या   सर्वाना    यातून  सूट देण्यात आलेली आहे.
विशेष म्हणजे, महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष अभियंत्यांनी वाहनतळ असलेले नकाशे स्वत:च्या स्वाक्षरीने मंजूर केले असले तरी प्रत्यक्षात बांधकाम करतांना याच अभियंत्यांच्या आशीर्वादाने वाहनतळाशिवाय इमारती उभ्या झाल्या आहेत. आता जिल्हा प्रशासनाने जिल्हा पोलिस अधीक्षक व महानगरपालिकेकडून वाहनतळ नसलेल्या हॉटेलचा अहवाल मागितला आहे.
हा अहवाल प्राप्त होताच पार्किंग नसलेल्या हॉटेल्सची एक यादी तयार करण्यात येणार असून यानंतर त्या हॉटेल्सवर सुध्दा कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

Story img Loader