मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या कर्मभूमी कराडमध्ये विकासाचे जणू नवे पर्वच सुरू केले आहे. जागतिक कीर्तीच्या भूकंप संशोधन केंद्राच्या ठोस कृतीनंतर विमानतळ विस्तारीकरणाची प्रक्रियाही यशस्वी होत आहे. कराडेच एसटी आगार एक मॉडेल म्हणून हायटेक बनविण्यात येत आहे. दरम्यान, कराडला शासकीय कृषी महाविद्यालय मंजुरीबरोबरच आता मलकापुरात शासकीय हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग कॉलेजच्या उभारणीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
कराडनजीकच्या मलकापूर नगरपंचायतीने शासकीय हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग कॉलेजसाठी १० एकर जागा दिली असून, लवकरच या कॉलेजची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील व जिल्हा संघटक, युवानेते राहुल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शासकीय कृषी महाविद्यालयास मंजुरी दिली असून, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या निकषानुसार या महाविद्यालयाची उभारणी होणार आहे. हे महाविद्यालय प्रगत तंत्रज्ञानाने साकारण्यात येत असून, हे एक संशोधन केंद्र व्हावे अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. कराड शहर व परिसरासह नजीकच्या मुंढे, सैदापूर व टेंभू या ठिकाणी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची जागा आहे. यातील एका जागेवर कृषी महाविद्यालय या शैक्षणिक वर्षांपासूनच सुरू होईल असा विश्वास आनंदराव पाटील व राहुल चव्हाण यांनी व्यक्त केला. हजारमाची येथील भूकंप संशोधन केंद्राच्या जागेला संरक्षक भिंत घालण्यासाठी पृथ्वीराजबाबांनी ४ कोटींचा निधी दिला आहे. या कामास लवकरच प्रारंभ होत आहे. तसेच हजारमाची ते बाबरमाची पुनर्वसित गावठाण रस्त्यासाठी ४ कोटी ४१ लाख रुपये मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. पाटणनजीकच्या संगमनगर धक्का पुलाशेजारीच मणेरी गौंड येथे उंचीचा आणि सुसज्ज असा पूल मंजूर झाला असून, पुरवणी अर्थसंकल्पात या नव्या पुलासाठी १२ कोटी ५१ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचे भूमिपूजनही लवकरच होणार आहे. याचबरोबर जिल्ह्यात ठिकठिकाणी विकासकामांना गती देण्याचे धोरण आहे. समाजातील वस्तुनिष्ठ जिव्हाळय़ाचे प्रश्न व लोकहिताच्या कामांना प्राधान्य देण्याचे धोरण असून, या कामात कोणीही श्रेयवादाचे राजकारण करताना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा योग्य बंदोबस्त केला जाईल. जनता फसव्या राजकारण्यांना भीक घालणार नाही असा इशारा त्यांनी दिला. याचबरोबर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांसाठी सव्वादोन कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याचे उभय नेत्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा