कारागृहातून संचित रजेवर आलेल्या एका सराईत गुन्हेगाराची सोमवारी सकाळी दिंडोरी रस्त्यावरील तलाठी कॉलनी परिसरात दिवसाढवळ्या हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. एका टोळक्याने तिक्ष्ण हत्यारांच्या सहाय्याने हा हल्ला चढविला. टोळीयुद्धातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, रविवारी रात्री सिडको परिसरातही उधारीवर दारू न दिल्यामुळे एका हॉटेलच्या व्यवस्थापकाची हत्या करण्यात आली.
तलाठी कॉलनीतील हल्ल्यात श्रीपाद सूर्यवंशी याचा जागीच मृत्यू झाला. सूर्यवंशी हा दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. कारागृहातून तो संचित रजेवर आला होता. सोमवारी सकाळी तलाठी कॉलनी परिसरात तो मित्रासमवेत उभा असताना हा प्रकार घडला. १० ते १२ जणांचे टोळके शस्त्रास्त्र घेऊन या ठिकाणी धडकले. ते पाहून सूर्यवंशी पळू लागला. टोळक्याने त्याचा पाठलाग सुरू केला. एका बंगल्यात शिरण्याच्या प्रयत्नात असलेल्या सूर्यवंशीवर टोळक्याने वार केले. घाव वर्मी बसल्याने सूर्यवंशी जागीच कोसळला. दरम्यानच्या काळात टोळके पसार झाले. अवघ्या काही मिनिटात घडलेल्या थरार नाटय़ामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सूर्यवंशीला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सूर्यवंशी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनासह गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत. टोळ्यांमध्ये असलेल्या वैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सिडको परिसरातील शिवाजी चौकात रविवारी रात्री कृष्ण परमिट रूप व बिअर बार या हॉटेलमध्ये खूनाचा प्रकार घडला. उधारीवर दारू न दिल्यामुळे साहेबराव म्हसू पिठेकर, प्रकाश दांडेकर व संदीप काळे यांनी हॉटेलचे व्यवस्थापक अशोक कचरू साळवे (४५) यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी साळवे यांचा मुलगा आकाश व अन्य दोघे जखमी झाले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.