मेन्युकार्डवरील दर डोळे विस्फारणारे
डिझेल, सिलिंडर दरवाढीचा जबर फटका
एलपीजी सिलिंडरच्या किंमतीची स्लॅब केंद्र सरकारने बदलल्याने सर्वच हॉटेल व रेस्टॉरंटधारकांना मेन्युकार्डमधील खाद्यपदार्थाच्या किंमतीत बदल करणे भाग पडणार आहे. ऐन नवरात्रीच्या काळात हॉटेलिंग आता महागडे होणार असून सामान्य कुटुंबांना हॉटेलात जाणे आता मुळीच परवडणार नाही, अशीच परिस्थिती उद्भवली आहे. शिवाय सिलिंडरच्या भाववाढीने हॉटेल व्यावसायिकांची सारीच समीकरणे अचानक बदलून गेली आहेत. खाद्यपदार्थाचे नवीन दर दर्शविण्यासाठी मेन्युकार्ड पुन्हा पुन्हा छापणे परवडत नाही कारण मेन्युकार्ड छापणेसुद्धा अत्यंत महागडे झाले आहे. परंतु, बदलत्या परिस्थितीत हा सारा आटापिटा करणे भाग आहे. सिलिंडरच्या वाढीव किंमतीत नवे दर कसे बसवायचे याची चिंता हॉटेलमालकांना पडली आहे. सिलिंडरच्या किंमतीतील बदलावर मेन्युकार्डवरील खाद्यपदार्थाची किंमत दरवेळी निश्चित करणे कठीण असल्याचे एक व्यावसायिक संजीव नहार यांनी सांगितले.
अशोका रेस्टॉरंटचे अशोक हंसस्लेस म्हणाले, हॉटेल व्यवसाय सध्या अत्यंत कठीण काळातून चालला आहे. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत असल्याचा फटका हॉटेल व्यवसायाला बसू लागला आहे. गेल्या वर्षभरात सिलिंडरच्या किंमतीत तब्बल ३० टक्के वाढ झाली. त्याकडे बघता ग्राहकांकडून जादा दराने वसुली करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलिंडरची किंमत ५०० रुपयांनी वाढविण्यात आली आहे. ऑगस्ट महिनाअखेपर्यंत एका सिलिंडरला १३१२.०५ रुपये मोजावे लागत होते. आता यासाठी १८०६ रुपये भरावे लागत आहेत. नागपूर शहरात ४ हजारावर रेस्टॉरंट आणि हॉटेल्स असून याची झळ त्यांना बसू लागली आहे.
डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने भाजीपाला आणि किराण्याच्या भावात वाढ झाली. आता एलपीजी सिलिंडरची किंमतही वाढविल्याने उत्पादन खर्चात एकाएकी वाढ झाली आहे. त्यामुळे खवय्येखोरांचा हॉटेलिंगचा खर्च १० टक्के वाढण्याची शक्यता आहे. ऐन नवरात्रीच्या काळात हॉटेलमधील खाद्यपदार्थाचे दर आकाशाला टेकणार आहेत. परिणामी हॉटेलच्या ग्राहकांची संख्या घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोठय़ा हॉटेलांमध्ये मेन्युकार्डवर नवे दर झळकू लागले आहेत. हल्दीरामच्या पदार्थामध्ये नवरात्रीपासून ५ ते १० टक्के वाढ होणार आहे.

Story img Loader