नववर्षांच्या स्वागतासाठी विदर्भातील विविध हॉटेल्स व रिसॉर्टस् व्यावसायिक सज्ज झाले आहेत. डीजेच्या संगीतावर खाण्या-पिण्याचा आस्वाद घेत नववर्षांचे स्वागत करण्याची तयारी सुरू झाली आहे. नवीन वर्षांच्या स्वागतासाठी तरुणाई अधिक जोशात आहे. या संधीचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी हॉटेल्स व रिसॉर्टस्मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नवीन वर्षांनिमित्त युवकांचा होणारा हैदोस रोखण्यासाठी काही सामाजिक संघटना प्रयत्न करीत असल्या तरी युवक – युवती नवीन वर्षांचे जल्लोषात स्वागत करीत असतात. कुटुंबासाठी ओपन एअर रेस्टॉरंट, जोडपे, युवक-युवतीसाठी विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरेटमध्ये व्यवस्था करण्यात आली. नववर्षांचे स्वागत करण्याचा तरुणाईमध्ये उत्साह आहे. त्यामुळे बहुंताश हॉटेल्समध्ये केवळ जोडप्यांना प्रवेशाची सोय करण्यात आली आहे. हॉटेल प्राईड, सेंटर पॉईंट, टेन डाऊन इन स्ट्रीट (टीडीएस), व्ही. फाईव्ह, सातपुडा हिल्स रिसॉर्ट, चोखर धानी, हॉटेल तुली, सन एन सॅन्ड, रॅडिसन ब्लू या मोठय़ा हॉटेल्समध्ये नववर्षांचे स्वागत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक हॉटेलमध्ये नवीन वर्षांसाठी विशेष पॅकेज घोषित करण्यात आले असून त्याचे बुकिंग सुरू झाले आहे. रॅडिसन ब्लूमध्ये यावेळी बाहेरच्या कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. अनेक नवीन हॉटेल्स नागपूरकरांची ‘टेस्ट ऑफ एन्जॉय’ पाहण्यासाठी उत्सुक आहेत. काही हॉटेल्समध्ये केवळ जोडप्यांसाठी कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामध्ये विशेष डीजेसह जेवण व ड्रींकचा समावेश असेल. काही महाविद्यालयीन युवकांनी ३१ डिसेंबरची रात्र शहराच्या बाहेर र्पयटन स्थळी किंवा फार्म हाऊसवर साजरी करण्याचे ठरविले आहे. सदर येथील व्ही. फाईव्ह रेस्टॉरंटचे लक्कीपाल सिंग यांनी सांगितले की, हौशी जोडप्यांसाठी आयोजित केलेल्या थर्टी फर्स्ट नाईटसाठी मुंबईहून डीजे बोलविण्यात आला आहे. डीजेच्या तालावर थिरकत नववर्षांचे स्वागत करताना ग्राहकांना सहा प्रकारचे स्टार्टर स्नॅक्स, इंडियन, कॉन्टीनेंटल व चायनीज जेवणाचा आनंद लुटता येणार आहे. डीजेसह फायर शोचेही आयोजन आहे. याशिवाय जवळपास सर्वच हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये डीजेची धूम ३१ डिसेंबरच्या रात्री वर्ष सरता- सरता ऐकू येणार आहे. हे सर्व डीजे हैदराबाद, मुंबई, दिल्ली असे बाहेरून बोलाविण्यात आले आहेत. बहुतांश हॉटेल्समध्ये एका जोडप्यासाठी प्रवेश शुल्क २००० ते ४००० रुपये आहे. नामांकित हॉटेल्समध्ये हा दर २५०० रुपयांहून अधिक आहे. प्रत्येक हॉटेलची क्षमता सुमारे १५० ते २०० जोडप्यांची आहे. याचा हिशेब केल्यास शहरातील नामवंत १० ते १५ हॉटेल्स व परिसरातील रेस्टॉरंटद्वारे एका रात्रीत १ कोटी रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे. याशिवाय अनेक छोटे हॉटेल्स, रेस्टॉरंट, खासगी फार्म हाईस, ढाबे या ठिकाणी लहान-मोठय़ा प्रमाणात पार्टीजचे आयोजन असल्याने नववर्षांमुळे नागपूरचे आर्थिक क्षेत्रही फुलणार आहे.
शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहता हिरमुसलेल्या मद्यशौकिनांनी त्यासाठी ग्रामीण भागाची निवड केली आहे. विविध रिसोर्ट्स, हॉटेल्स, धाबे तसेच जलपर्यटन केंद्र, फार्म हाऊस या ठिकाणी या दिवशी गर्दी उसळते. ग्रामीण भागात पोलिसांचे तेवढे लक्ष नसते, असे अनेकांना वाटत असले तरी ते चुकीचे ठरणार आहे. गेल्यावर्षी मद्यधुंदांचा गोंधळ व त्यामुळे ग्रामस्थांशी वाद घडले होते. यासाठी जिल्ह्य़ात पोलीस अधीक्षकांसह दोन हजारावर पोलीस ग्रामीण भागात विशेष लक्ष ठेवणार आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, उपअधीक्षक संतोष वानखडे, डॉ. सूर्यभान इंगळे, विलास देशमुख, रामलखन यादव यांच्या नेतृत्वाखाली दोन हजारांवर ग्रामीण पोलिसांना विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.
नववर्ष स्वागतासाठी हॉटेल्स, रिसॉर्टस् सज्ज
नववर्षांच्या स्वागतासाठी विदर्भातील विविध हॉटेल्स व रिसॉर्टस् व्यावसायिक सज्ज झाले आहेत.
आणखी वाचा
First published on: 31-12-2013 at 08:00 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hotels resort prepare for new year