ऑस्करच्या शर्यतीत भारतातर्फे ‘बर्फी’ची निवड झाली असली तरी अजून एक भारतीय, नव्हे मराठी चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट परदेशी चित्रपटांच्या वर्गवारीत नव्हे तर मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या स्पर्धेत असेल. ‘होऊ दे जरासा उशीर’ असे या चित्रपटाचे नाव असून २२ नोव्हेंबर रोजी कॅलिफोर्नियात या चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमियर होणार आहे. हा चित्रपट महाराष्टात जानेवारी महिन्यात प्रदर्शित करण्यात येईल, असे निर्माता ताहीर मनेर यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.
अनुराग बसू यांच्या ‘बर्फी’ची निवड ऑस्करच्या ‘परदेशी चित्रपट’ या वर्गवारीसाठी भारतातर्फे झाल्याने सर्वप्रथम भारतात प्रदर्शित झालेल्या इतर भारतीय चित्रपटांना ऑस्करचे दरवाजे बंद झाले होते. त्यामुळे देविशा फिल्म्सचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘देऊळ’ही या स्पर्धेपासून बाहेर फेकला गेला. मात्र आता दिग्दर्शक वसीम मनेर आणि निर्माता ताहीर मनेर यांनी वेगळीच क्लृप्ती लढवत ‘होऊ दे जरासा उशीर’ या चित्रपटासाठी ऑस्करची कवाडे खुली केली आहेत. ऑस्करच्या स्पर्धेत उतरण्यासाठी या चित्रपटाचा प्रिमियर अमेरिकेत, कॅलिफोर्नियात करण्याचे धाडस हे दोन कलावंत दाखवत आहेत. मात्र त्यामुळे त्यांना आता मुख्य प्रवाहातील चित्रपटांशी स्पर्धा करावी लागणार आहे.
सध्याचे युग धावपळीचे आहे. मात्र आपण नेमके कशासाठी धावत आहोत, हेच अनेकांना माहिती नसते. त्यामुळे आयुष्याच्या अखेरीस, याचसाठी केला होता का एवढा अट्टाहास, असा विचार मनात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याच धावपळीवर विचार करायला लावणारा चित्रपट घेऊन आपण ऑस्करच्या शर्यतीत उतरत असल्याचे ताहीर मनेर यांनी स्पष्ट केले. या चित्रपटात सदाशिव अमरापूरकर अनेक वर्षांनी मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. ‘धावपळीत’ व्यग्र असणाऱ्या तीन तरुणांना वेळोवेळी कोडय़ात टाकणाऱ्या आणि अंतर्मुख करणाऱ्या सुफी फकिराची भूमिका त्यांनी केली आहे. त्याशिवाय या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, शर्वरी जमेनीस, राज रनवरे, अदिती सारंगधर, ऐश्वर्या नारकर आदी कलाकारही प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.
आतापर्यंत या चित्रपटाचा निर्मितीखर्च ९० लाखांपर्यंत गेला असून कॅलिफोर्नियात वर्ल्ड प्रिमियर करण्यासाठीही बराच खर्च येणार आहे. मात्र त्याचा फायदा आम्हाला पुढे महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित करताना नक्कीच होईल, असे ताहीर यांना वाटते.

Story img Loader