कल्याण पोलीस दलाचा भार वाहणाऱ्या उपायुक्त कार्यालयाभोवती असलेल्या काही वसाहतींमध्ये गेल्या पाच दिवसांपासून चोरटय़ांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून या परिसरात मोठय़ा प्रमाणावर घरफोडय़ांचे प्रकार घडू लागल्याने रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याच परिसरात पादचाऱ्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून तब्बल २ लाखांचा ऐवज लुटून नेण्यात चोरटे यशस्वी झाले आहेत. कल्याण भागातील अतिशय महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे सगळे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला असून पोलीस करतात तरी काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.  
कल्याण रेल्वे स्थानकाजवळ या भागातील कायदा-सुव्यवस्थेचा भार वाहणाऱ्या पोलीस उपायुक्तांचे कार्यालय आहे. तसेच याच भागात महात्मा फुले पोलीस ठाणेही आहे. कल्याण शहराचा मध्यवर्ती परिसर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. तसेच याच भागात पोलीस उपायुक्तांचे कार्यालय असल्याने या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांचा नेहमीचा वावर असतो. असे असताना मागील पाच दिवसांपासून चोरटय़ांनी बंद घरांचे कडीकोयंडे तोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
कल्याणमधील जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ राहणाऱ्या प्रमोद उपाध्याय यांच्या घरातून ७३ हजारांचा ऐवज नुकताच चोरून नेण्यात आला आहे. याशिवाय रामबागमधील तनुजा राजे यांच्या घरातून १ लाख २० हजारांची चोरी झाली. राणे यांच्या घरातील एक लाखाचा ऐवज, रामचंद्र सापोडे यांच्याकडील दीड लाख, मयूर कोयंडे यांच्या घरातील ५ लाखांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. ही कुटुंबे समारंभ, सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेल्याने त्यांच्या घरांचे कडीकोयंडे तोडून या चोऱ्या करण्यात आल्या आहेत. डोंबिवलीत विवाह समारंभातून घरी जात असताना टंडन रस्ता येथे नलिनी ढसाळ यांच्या गळ्यातील ९० हजार रुपयांच्या सोनसाखळ्या भुरटय़ा चोरांनी हिसकावून नेल्या.
ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात सातत्याने असे प्रकार घडत असल्याने ठाणे पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह उभे राहू लागले आहे. निवडणुकीच्या काळात गल्लीबोळात जागता पहारा ठेवणाऱ्या पोलिसांना अचानक झाले तरी काय, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. ठाण्यातील घंटाळी परिसरात व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरटय़ांना जेरेबंद करण्यात पोलिसांना यश आले असले तरी कल्याणात घरफोडय़ा, चोरीचे सत्र सुरूच राहिल्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट व्यक्त होऊ लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा