अस्वच्छतेचा सर्वाधिक परिणाम होतोय तो पर्यावरणावर आणि त्या अनुषंगाने सर्व जीवसृष्टी प्रभावित होत आहे. मात्र, ही अस्वच्छता निर्माण करण्यास नागरिकच सर्वाधिक जबाबदार आहेत. आपले घर स्वच्छ ठेवायचे आणि परिसरात मात्र घाण करायची, ही मनोवृत्ती पर्यावरणासाठी सर्वाधिक घात ठरत असल्याचे मत या क्षेत्रात काम करणाऱ्या पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले.
शहरातील अस्वच्छतेसाठी प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही. अलीकडे अपार्टमेंटमध्ये राहणारी मंडळी कचरा उचलणारी घंटागाडी गेली तरीही खाली उतरायला तयार नसतात. वरूनच कुठेतरी कचरा फेकला जातो आणि हा कचरा महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या या कर्मचाऱ्यांनी उचलावा अशी त्यांची अपेक्षा असते. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करण्याची तसदीही आधुनिक जीवनशैलीत जगणारी ही माणसं घेत नाहीत. त्यांनी पसरवलेल्या कचऱ्यामुळे कर्मचार्यांना आरोग्याचे सर्वाधिक दृष्परिणाम भोगावे लागतात. शहरात भटक्या कुत्र्यांचे, डुकरांचे वास्तव्य वाढल्याची ओरडही हीच मंडळी करतात, पण घरातला कचरा परिसरात टाकून त्यांना आमंत्रण देणारी हीच मंडळी आहेत. शहर आपले समजून ही मंडळी या शहरात राहायला शिकली, तर पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची आणि परिणामी आरोग्यावर दुष्परिणाम होण्याच्या घटनाच घडणार नाहीत, असे मत आयसॉ या संस्थेचे प्रमोद कानेटकर यांनी व्यक्त केले.
अस्वच्छतेचा दुष्परिणाम जीवसृष्टीवर आणि त्या जीवसृष्टीचाच एक घटक असलेल्या पक्ष्यांवर मोठय़ा प्रमाणात होत आहे. साधारणपणे हा कचरा वर्षभर शहराच्या बाहेर साठवून ठेवला जातो आणि हिवाळयात कधी तरी त्याची विल्हेवाट लावली जाते. कचरा विल्हेवाटीचे व्यवस्थापन नसल्यामुळे पर्यावरण प्रदूषित करण्यास ते आणखी कारणीभूत ठरते. साठवललेल्या कचऱ्याच्या डोंगराला आग लावली जाते. त्यामुळे धूर पसरून वातावरणातील ऑक्सिजन कमी होण्यासोबतच पक्ष्यांसाठीसुद्धा ते हानीकारक ठरते. साठवून ठेवलेला कचरा सडल्यामुळे पक्ष्यांच्या पोटात तो कचरा जातो आणि ते मृत्युमुखी पडतात. शहरातील कचरा उचलण्याचे व्यवस्थापन ज्यांना दिले आहे ते देखील कचऱ्याची विल्हेवाट नीट न लावता तो कचरा नदीत सोडल्याचे आम्ही प्रत्यक्षात पाहिले आहे, असे डॉ. अनिल पिंपळापुरे म्हणाले.शहर अस्वच्छ करण्यात आणि पर्यावरणाला बाधा पोहोचविण्यात सर्वाधिक कारणीभूत घटक प्लॅस्टिक आहे. आजही लोक कारमधून जातील तर पाण्याचे पाऊच, खाल्यानंतर ते प्लॅस्टिकचे आवरण, पाण्याच्या बॉटल्स कारचा काचा खाली करून रस्त्यावरच फेकतात. या प्लॅस्टिकमुळे नाल्या चोक होण्याचे आणि पावसाळयात रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. कॅलिफाोर्निया येथे पाण्याच्या बॉटल्सवर १०० टक्के बंदी आणली आहे. अशी बंदी आपल्याकडेही झाली तर कदाचित पर्यावरण राखण्यास थोडा हातभार मिळेल. या वाढत्या प्लॅस्टिकच्या वापरामुळे आणि कचऱ्यामुळे नदी, तलावातील जीवसृष्टी नष्ट होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा