येथील काँग्रेसनगर मार्गावरील खंडेलवाल बंधूंच्या निवासस्थानी धाडसी चोरी करून चोरटय़ांनी सुमारे साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना लक्ष्मीपूजनानंतर सोमवारी पहाटे घडली.
येथील श्यामनगर परिसरात बाबूसेठ खंडेलवाल आणि त्यांचे बंधू रामनिवास खंडेलवाल आपल्या कुटुंबीयांसमवेत दोन मजली घरात राहतात.
रविवारी रात्री लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ११ वाजताच्या सुमारास खंडेलवाल कुटुंबीय झोपी गेले.
मध्यरात्रीनंतर २ वाजताच्या सुमारास खालच्या मजल्यावर राहणारे रामनिवास खंडेलवाल यांचा मुलगा सुमीत याला दार उघडण्याचा आवाज ऐकू आला. याचवेळी रामनिवास यांच्या पत्नी गीता यांनाही घरात कुणीतरी शिरल्याची चाहूल लागली. दोघांनीही आरडाओरड केली. सुमीत याने चोरटय़ांचा पाठलाग करण्याचा प्रयत्नही केला, पण ते पळून गेले.
घरात शिरून चार ते पाच जणांनी चोरी केल्याचे त्यांच्या लक्षात आले. खंडेलवाल यांनी देवघरात जाऊन पाहिल्यावर त्यांना तेथे सोन्याचे दागिने, चांदीच्या लक्ष्मीच्या मूर्ती आणि रोकड नसल्याचे दिसून आले. खंडेलवाल यांनी लगेच फ्रेझरपुरा पोलिसांना चोरीच्या घटनेची माहिती दिली. पोलीस पथकाने लगेच पोहोचून खंडेलवाल यांच्या घराची पाहणी केली.
चोरटय़ांनी घरातून १ लाख रुपये किमतीच्या दोन किलो वजनाच्या चांदीच्या दोन लक्ष्मीच्या मूर्ती, दीड लाख रुपये किमतीचे २० ग्रॅमच्या सोन्याच्या बांगडय़ा, ५० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठय़ा, १ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ४० हजार रुपयांचे दोन मोबाईल, चार हजार रुपयांच्या साडय़ा, रोकड, असे मिळून साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केल्याचे लक्षात आले. चोरांनी घराच्या मागील दाराने प्रवेश केला आणि थेट देवघरात शिरून चोरी केली. घटनास्थळी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रियाझुद्दिन देशमुख यांनीही खंडेलवाल यांच्या घरी भेट दिली. दिवाळीच्या दिवशी वर्दळीच्या मार्गावरील घरातून लाखोंचा ऐवल लंपास करून चोरांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.  

Story img Loader