शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंधे कॉलनी परिसरात असलेल्या राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये चोरटय़ांनी एकाचवेळी चार सदनिका फोडल्या. यापैकी एका घरातून १० तोळे सोने व १९ तोळे चांदीसह पाच लाख १२ हजारांचा ऐवज लंपास केला, तर शेजारी राहणाऱ्या तिघाजणांची घरफोडी करण्याचा प्रयत्न झाला. या निमित्ताने चोरटय़ांची दिवाळी झाल्याचे दिसून आले.
या संदर्भात साकेत अरुण मेहता (वय ३०, रा. ४, राधाकृष्ण अपार्टमेंट) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेहता कुटुंबीय आठ दिवसांपूर्वी घर बंद करून पुण्याला गेले होते. दरम्यान, चोरटय़ांनी संधी साधून मेहता यांचे बंद घर फोडले. यात त्यांच्या घरात कपाटातील पन्नास हजार रोख, १० तोळे सोने, १९ तोळे चांदीचे पदक व इतर वस्तू असा एकूण पाच लाख १२ हजार रुपये किंमतीचा ऐवज लांबविला. याशिवाय मेहता यांच्या शेजारी राहणारे मदनलाल मोतीलाल होटकर, अनिल म्हाळप्पा माळगे व पांडुरंग वागदरीकर यांचीही घरफोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के हे या गुन्ह्य़ाचा तपास करीत आहेत.
विवाहितेची आत्महत्या
पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासामुळे वैतागून विवाहितेने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. सात रस्त्यावरील विनायक रेसिडेन्सीमध्ये हा प्रकार घडला. निर्मला विजय नंदूरकर (वय ३२) असे दुर्दैवी मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती विजय सिद्राम नंदूरकर याच्याविरुध्द मृत निर्मला हिचे वडील मारुती रामचंद्र जाधव (वय ५०, रा. चिखली, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महिलेचा खून
अक्कलकोट तालुक्यातील किणीवाडी येथे लहान मुलांच्या भांडणावरून झालेल्या तक्रारीचे पर्यावसान एका महिलेच्या हत्येत झाले. सुरेखाबाई शंकर पवार (वय ३७, रा. हुबळी, जि. धारवाड, कर्नाटक, सध्या रा. किणीवाडी, ता. अक्कलकोट) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
या प्रकरणी शिवाजी हुसेनी पवार व त्याचा मुलगा टॉम्या शिवाजी पवार (दोघे रा. सिंदगाव, ता. तुळजापूर, सध्या रा. किणीवाडी, ता. अक्कलकोट) या दोघा बापलेकाविरुध्द अक्कलकोट उत्तर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी सुरेखाबाई हिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात गंभीर जखमी होऊन ती मरण पावली.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा