राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले
सामाजिक न्याय व विशेष साह्य़ विभागाच्यावतीने महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन उदासीन असल्यामुळे या योजनेचे कोटय़वधी रुपये परत जाण्याच्या मार्गावर आहेत. या योजनेत निवड झालेल्या २५० लाभार्थीपैकी केवळ ४३ लाभार्थीना दोन वर्षांत धनादेश देण्यात आले. इतर लाभार्थीना मात्र अद्याप कोणताही लाभ मिळालेला नाही, असा आारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहर (जिल्हा) अध्यक्ष अजय पाटील यांनी केला.
शहरातील दारिद्रय़ रेषेखालील लाभार्थीना या योजनेत प्राधान्य देऊन दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. या योजनेत २५० लाभार्थीची निवड करण्यात आली, पण गेल्या दोन वर्षांत केवळ ४३ लाभार्थीनाच धनादेश देण्यात आले. इतर लाभार्थी मात्र या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शासनातर्फे देण्यात आलेले १४ कोटी, ९० लाख, ६० हजार रुपये परत जाण्याच्या मार्गावर आहेत. याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्व विभागाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत बनकर यांनी लक्ष वेधले असता धनादेश वाटपासाठी १४३ लाभार्थीची बिले तयार असून या सर्वाना पुढील महिन्यात धनादेश वाटप करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त वर्धने यांनी दिले.
घरकुल निर्माण कार्याला गती देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्यातील तज्ज्ञ मंडळींनी एक घरकुल निर्माण समिती बनविली होती. या समितीने ३५९४ संभाव्य लाभार्थीची यादी तयार केली होती, पण आतापर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण झालेले नाही. प्रशासन व महापालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे मागासवर्गीयांना योजनेचा लाभ मिळालेला नाही, असे पाटील म्हणाले.
घरकुल योजनेची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणी त्यांनी केली. शिष्टमंडळात डॉ. प्रशांत बनकर, तनुज चौबे, सतीश इटकेलवार, चरणजित सिंग चौधरी, योगेश मसराम, अब्दुल कादीर सेख, शेखर रोकडे, मनीष गायकवाड, धर्मेद्र खमेले, त्रिकोल ठाकरे, नरेंद्र जैन यांचा समावेश होता.