ऐरोलीतील फॅन्चेला फ्रॉन्सिस्को या आठ वर्षीय मुलीचे अपहरण आणि नंतर झालेल्या हत्येमुळे मोठय़ा शहरातील गृहनिर्माण सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. फॅन्चेलाच्या सोसायटीत सीसीटीव्ही लावले गेले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता, अशी चर्चा सुरू झाली आहे. पोलीस सीसीटीव्ही लावण्याचा आग्रह प्रत्येक सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे करीत आहेत, पण पदाधिकारी खर्चाचे कारण सांगून असे सीसीटीव्ही लावण्यास टाळाटाळ करीत असल्याची बाब पुढे आली आहे.
शहरातील मोक्याच्या ठिकाणी २६८ सीसीटीव्ही लावणारी नवी मुंबई पालिका ही राज्यातील पहिली पालिका ठरली आहे. त्यानंतर आणखी ५०० सीसीटीव्ही लावण्याची घोषणा तात्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केली होती, पण आता पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने ही योजना लांबणीवर पडली आहे. बडय़ा शहरातील गृहनिर्माण सोसायटींनी किमान प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही लावावेत, असे आवाहन पोलिसांच्या वतीने नेहमीच केले जाते. नवी मुंबईत साडेपाच हजार गृहनिर्माण सोसायटय़ा आहेत. त्यातील बोटावर मोजण्याइतक्या सोसायटींनी सीसीटीव्ही लावले आहेत. त्यामुळे सोसायटी आवारात होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर २४ तास लक्ष ठेवले जात आहे.
सीसीटीव्हीचे महत्त्व जाणणाऱ्या काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या मदतीचा पालिका निवडणुकीच्या काळात खुबीने उपयोग केला. एकगठ्ठा मतांसाठी निवडणूक लढणाऱ्या प्रभागात सीसीटीव्ही देण्यात आलेल्या आहेत. फॅन्चेला राहात असलेल्या सोसायटीलाही अशाच प्रकारे एका अपक्ष उमेदवारांकडून सीसीटीव्ही बसविण्याचा निधी दिला गेला होता, पण पदाधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ते कॅमेरे लावले गेले नाहीत. फॅन्चेलाच्या सोसायटीच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही लावले गेले असते तर तासाभरात फॅन्चेलाचे अपहरण कोणी केले आहे ते सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील नातेवाईकांच्या साक्षीने स्पष्ट केले असते पण ही सुविधा उपलब्ध नसल्याने पोलिसांना ऐरोली टोलनाक्यावरील सीसीटीव्हीच्या फुटेजवर अवलंबून राहावे लागले होते. विशेष म्हणजे फॅन्चेलाच्या इमारतीचा परिसर हा व्यापाऱ्यांच्या संकुलांचा आहे. जवळच एचडीएफसीचे एटीएम आहे, पण केवळ आपल्या एटीएममधील ग्राहकांवर नजर ठेवणाऱ्या या बँकेने एटीएमबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नाहीत की आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची काळजी घेतलेली नाही. त्यामुळे फॅन्चेलाचा नाहक बळी गेल्याची चर्चा आहे. या एका घटनेमुळे सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक सोसायटय़ा खर्चीक असल्याची सबब देऊन कॅमेरे लावण्यास टाळाटाळ करीत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे गृहनिर्माण सोसायटीत होणाऱ्या प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा हालचालींवर लक्ष तर राहते, याशिवाय पोलिसांना होणाऱ्या वाहनचोरी व चेन स्नॅचिंगचा तपास लावण्यात हे कॅमेरे मोठी भूमिका पार पाडत आहेत. दरम्यान, फॅन्चेलाची आई आजारी असल्याने ती शाळेतून सुटल्यानंतर सोसायटी प्रवेशद्वारावर तिला आणण्यास आली नाही. या घटनेनंतर मुलांना स्कूल बसपर्यंत सोडणारे व आणणारे पालक अधिक सर्तक झाले आहेत. याशिवाय लहान मुलांना घराबाहेर पाठविताना पालक गंभीर झाले आहेत. फॅन्चेलाचा गॉडफादर असलेला ( फॅन्चेलाच्या आई-वडिलानंतर तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी या काकाने चर्चमध्ये सर्वासमक्ष उचलली होती) तिचा काका खुनी झाल्याने पालकामध्ये चिंचा व्यक्त केली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा