सार्वजनिक ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे लावून शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी विविध पोलीस आयुक्तालये पुढे सरसावलेली असताना शहरातील खासगी गृहनिर्माण सोसायटींनी असे कॅमेरे लावून सोसायटी परिसरात घडणाऱ्या हालचालींवर चोवीस तास लक्ष ठेवावे यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने नुकतेच एक सोसायटी पदाधिकाऱ्यांचे शिबिर सिडकोमध्ये घेण्यात आले.
नवी मुंबई पालिकेने आपल्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी २६२ कॅमेरे लावले असून सिडकोनेही खारघर, पनवेल, कामोठे परिसरांत असे ५०० सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी कंबर कसली आहे. हा उपक्रम ऐच्छिक असला तरी जास्तीत जास्त खासगी सोसायटींनी यात सहभाग घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले असून त्याची सुरुवात नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतून करण्यात आली आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोठय़ा शहरांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे ठिकठिकाणी बसविण्याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली. मुंबईमध्ये असे कॅमेरे बसविण्याची निविदा अद्याप लाल फितीत अडकली आहे, मात्र नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईने याबाबत पुढाकार घेतला असून शहरात मोक्याच्या सार्वजनिक ठिकाणी पालिकेच्या वतीने २६२ सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याचे नियंत्रण बेलापूर येथील पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयातून केले जात आहे. त्यासाठी वीस लाख रुपये खर्च करून अद्ययावत नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.
सिडको आणि पालिका यांच्या पुढाकाराने नवी मुंबईत निर्माण होणारे सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे अधिक सक्षम आणि व्यापक व्हावे यासाठी राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घेतला असून माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश अग्रवाल यांनी नुकतीच सिडको मुख्यालयातील सभागृहात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सिडकोच्या दक्षता विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा सरवदे आणि पोलीस उपायुक्त विजय पाटील उपस्थित होते. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच या बैठकीला हॉटेल्स, मॉल्स, थिएटर, हॉस्पिटल, शाळेच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते.
संपूर्ण नवी मुंबईत सुमारे दोन हजार खासगी सोसायटय़ा आहेत. त्यातील काही सोसायटय़ांनी स्वेच्छेने असे कॅमेरे लावले आहेत. शहरातील जास्तीत जास्त सोसायटय़ांनी असे कॅमेरे लावावेत असा प्रयत्न माहिती तंत्रज्ञान विभागाने सुरू केला आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमुळे शहरात होणारी गुन्हेगारी उघडकीस आणण्यात पोलिसांना मोलाची मदत होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले कॅमेरे हे प्रत्येक गुन्ह्य़ाचे चित्रीकरण करेलच याची शाश्वती देता येत नाही, पण सोसायटी, मॉल्स, शाळा, हॉस्पिटल यांसारख्या खासगी संस्थांनीही सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची नजर गुन्हेगारांवर ठेवल्यास गुन्हे, अपघात, महिलांची छेडछाड, सोनसाखळी, घरफोडी यांसारख्या गुन्ह्य़ांवर नियंत्रण मिळविण्यास खूप मोठे सहकार्य मिळणार असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे अनेक खासगी सोसायटय़ांनी असे कॅमेरे बसविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
सीसी टीव्ही कॅमेरे लावणाऱ्या सोसायटय़ांना तसा स्पष्ट उल्लेख केलेला फलक लावावा लागणार आहे. यात खासगी जीवनात डोकावण्याचा प्रयत्न होता कामा नये अशा दृष्टीने या कॅमेऱ्यांची उभारणी करण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
आवश्यक असेल तेव्हा या कॅमेऱ्यांतील फुटेज पोलिसांना देणे बंधनकारक राहणार आहे. काही सोसायटय़ांच्या बाहेर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांची जोडणी थेट पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाशी जोडली जाणार आहे. सीसी टीव्ही लावणाऱ्या कंपनीची माहितीदेखील जाहीर करावी लागणार असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
पालिकेच्या उपक्रमाचा आदर्श सिडकोने घेतला
नवी मुंबई पालिकेने सुरू केलेल्या या उपक्रमाचा सिडकोनेही आदर्श घेतला असून त्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या खारघर, पनवेल, कामोठे, कळंबोली या विकसित भागांत ५०० सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच या कामाची निविदा काढून कामाला सुरुवात केली जाणार आहे. या कॅमेऱ्यांमधून टिपण्यात येणारे चित्रीकरण इंटरनेटद्वारे पोलीस नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली जाणार आहे.