जीवनातील अंधार दूर करणारा, दु:ख बाजूला सारून दोन क्षण सुखाची ज्योत प्रज्वलित करणारा सण म्हणून दीपोत्सव साजरा केला जातो. परंतु काहींसाठी हा आनंद क्षणभंगूर तर नव्हेच, पण दुरापास्तही ठरला आहे. आमची कसली दिवाळी, आमचे जगणे म्हणजे रोजचाच शिमगा, असेच या उपेक्षितांचे अंतरंग आहे.
शहरातील नांदेड रस्त्यावर मांग, गारुडीवस्तीवरील हीच प्रातिनिधिक भावना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या लोकांचे जीवन मोठय़ा कष्टाने पिचले आहे. सुमारे २४ वर्षांपूर्वी या वस्तीचे विलासनगर वस्ती असे नामकरण करण्यात आले. भंगार वेचणे, बूटपॉलिश करणे, कचरा गोळा करणे अशी कामे या वस्तीवरील लोक करतात. नऊ वर्षांपूर्वी (२००४) शहरातील कचरा गोळा करण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या कार्यकाळात घंटागाडीची कल्पना आली. सुमारे १५० लोकांना घंटागाडीमुळे रोजगार मिळाला. शहराच्या विविध भागात जाऊन रोज कचरा गोळा केल्यानंतर नागरिक प्रत्येक कुटुंबातून महिन्याला २० रुपये देत असत. दोन वष्रे या पद्धतीने कचरा गोळा केला. त्यानंतर मात्र जानेवारी २००६ ते ऑक्टोबर २०१२ अशी सुमारे ७ वष्रे शहरातील कचरा गोळा करण्याचे कंत्राट स्वयंसेवी संस्थेला देण्यात आले. त्यातून या वस्तीवरील सुमारे ३५०जणांना रोजगार मिळाला. यात ६७ महिलांचा समावेश होता.
कचरा गोळा करणाऱ्यांमध्ये ४२ कुष्ठरोगी मंडळीही होती.
पूर्वी वस्तीवरील लोकांना रोजगार नसल्यामुळे चोऱ्यामाऱ्या करणे, गुन्हेगारी कामे करण्याची सवय जडली होती. कचरा उचलण्याचे काम मिळाल्यानंतर हळूहळू ही सवय सुटली. घरात चार पसे येऊ लागले. चांगले जीवन जगण्याची संधी मिळाली. त्यामुळे वाईट कामे करायची नाहीत, असा संकल्प या वस्तीतील लोकांनी सोडला. वस्तीतील ५ महिला कचरा गोळा करणाऱ्या कामगारांवर देखभाल करण्याचे काम करू लागल्या. राज्यात असे काम फक्त लातूरमध्येच होत होते.
वस्तीतील लोकांना काम नव्हते, तेव्हा शाळेत जाणारी मुले केवळ २३ होती. त्यानंतर १०० टक्के मुले शाळेत जाऊ लागली. १६० मुले-मुली रोज शाळेत जात होती. बूटपॉलिश करणे, भंगार गोळा करणे अशी कामे मुलांवर लादली जात नव्हती. पुरुष व महिला बचतगट स्थापन झाले. बचतगटांची संख्या ४०पर्यंत पोहोचली. कचऱ्यापासून कोळसाकांडी तयार करण्याचा प्रकल्पही संजय कांबळे यांच्या पुढाकाराने व कर्वे फौंडेशनच्या सहकार्याने सुरू झाला. वस्तीतील लोकांचे आरोग्य चांगले राहावे, या साठी आरोग्य केंद्रही सुरू झाले. लोकांची मोफत तपासणी व औषधवाटप जनाधार स्वयंसेवी संस्थेमार्फत केले जात होते. कुटुंबकल्याण शत्रक्रिया मोठय़ा प्रमाणावर होत होत्या. परंतु गेल्या वर्षी ऑक्टोबरनंतर शहरातील कचरा गोळा करण्याचे कंत्राट महापालिकेने रद्द केले आणि गेले वर्षभर या लोकांचा रोजगार पूर्ण बुडाला. महापालिकेने स्वत:ची यंत्रणा उभी करून कचरा गोळा करण्यास प्रारंभ केला, त्यात वस्तीतील केवळ ५० जणांनाच रोजगार मिळाला. गेले वर्षभर ३०० जण रोजगाराविना असून पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ सुरू झाले आहे.
शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या ५० टक्के घटली. कुटुंबात उत्पन्नाचे साधन कमी झाल्यामुळे मुलांना बूटपॉलिश करणे, भंगार गोळा करणे, हॉटेलमध्ये काम करणे अशी कामे करावी लागत आहेत. वस्तीतील लोकांना कामे होती, म्हणून काही तरुणांचे विवाह झाले. मात्र, हातचे काम गेल्यामुळे मुलांसकट पत्नी माहेरी गेल्याचे व पती काही काम करणार नाही तोपर्यंत सासरी परत न येण्याचे त्यांनी ठरवले. वस्तीत दारू पिण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरात गांधी चौक पोलीस ठाण्यात या भागातील गुन्हेगारीचे रेकॉर्डवरील प्रमाण तिपटीपेक्षा वाढल्याचे दिसून येत आहे.
हाताला काम नसल्यामुळे भांडणांचे प्रमाण वाढले. छोटय़ा-मोठय़ा चोऱ्यांमध्ये सापडल्याने पोलिसांकडून मार खावा लागतो. पोलिसांच्या मारापासून गरोदर महिलाही सुटल्या नाहीत. शुक्रवारी दिवाळीचा पहिला दिवस. धनत्रयोदशी म्हणून दिवाळी साजरी केली जाते. मात्र, वस्तीत आता धनच शिल्लक नसल्यामुळे लोक अस्वस्थ आहेत. एकाही घरावर आकाशकंदील नाही. जीवनातील अंधकार पुन्हा वाढणार, ही भीती लोकांच्या मनात घर करून बसली आहे. माजी नगरसेविका अयोध्याबाई उपाध्याय यांनी ही व्यथेवर नेमके बोट ठेवले.
दारूविक्री, मटका चालवणे अशी कामे वस्तीवरील पोरे करीत आहेत. कोणत्या तोंडाने त्यांना ही कामे करू नका म्हणून सांगू? त्यांनी चांगल्या मार्गाची कामे द्या, असे मला विचारले तर मी त्यांना कोणत्या तोंडाने उत्तर देऊ? असे त्या म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा