अरबाज आणि सोहेल या दोन भावांना ‘सलमान’ नावाच्या ‘फेविकोल’ने अजून तरी घट्ट बांधून ठेवले आहे. मात्र सलमानशी कायम एकनिष्ठ असलेल्या सोहेल आणि अरबाज या दोघांचे संबंध गेल्या काही दिवसांपासून बिघडत चालले आहेत. एवढे की दोघेही एकमेकांची नावे न घेता परस्परांवर टीका करू लागले आहेत. अरबाजच्या ‘दबंग २’पासून या वादाची ठिणगी पडली होती. आता सलमान सोडला तर या दोघांनाही एकत्र येण्याचे निमित्त उरलेले नाही. सोहेल खान पहिल्यापासूनच चित्रपट निर्मिती-दिग्दर्शन क्षेत्रात आहे. ‘सोहेल खान प्रॉडक्शन’ अंतर्गत सलमान आणि अरबाज या दोघांना घेऊन सोहेलने ‘हॅलो ब्रदर’, ‘प्यार किया तो डरना क्या’सारखे अनेक हीट चित्रपट दिले. पण अरबाजची गाडी अभिनयाच्या रुळावर स्थिरावत नव्हती. म्हणून त्याने ट्रॅक बदलला आणि चित्रपट निर्मितीला हात घातला. अरबाजच्या पहिल्याच चित्रपटाने त्याला कोटय़वधींचे ‘दबंग’ यश मिळवून दिले. सलमानच्याच भाषेत सांगायचे तर ‘दबंग’ने खान परिवाराला चित्रपट निर्मितीतला नफा पहिल्यांदा दाखविला.
‘दबंग’ नंतर सलमानची लोकप्रियता एवढी वाढली की त्याच्याकडे चित्रपटांची रांग लागली. त्या गर्दीत ‘दबंग २’ला तारखा मिळाल्या. मात्र सोहेलचे चित्रपट रखडले. याचाच परिणाम म्हणून ‘दबंग२’वर आणि अरबाजच्या दिग्दर्शनावर सोहेलने ताशेरे ओढले. अरबाजने अजूनपर्यंत आपल्या भावावर उघडपणे टीका केली नव्हती. मात्र सोनी टीव्हीवरच्या ‘कॉमेडी सर्कस’चा परीक्षक म्हणून सोहेलच्या जागी अरबाजने काम पाहावे अशी विनंती त्याला करण्यात आली. तेव्हा मात्र अरबाजचा संयम सुटला. मलाच परीक्षक म्हणून कायम करणार असाल तर ठीक आहे. मी कोणाचा बदली म्हणून काम करणार नाही, असे सांगत अरबाजने आपल्या रागाला मोकळी वाट करून दिली आहे. त्यामुळे सलमान नावाचा ‘फेविकोल’ या दोन भावांना किती दिवस एकत्र बांधून ठेवतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा