कळवा, मुंब्य्रासारख्या बकाल रेल्वे स्थानकांचा एकीकडे कायापालट सुरू असताना कल्याण-डोंबिवलीतील रेल्वे स्थानक परिसर पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी गजबजून गेला आहे. महापालिका तसेच रेल्वे विभागामार्फत या फेरीवाल्यांवर कोणत्याही स्वरूपाची कारवाई होत नसल्यामुळे हा सर्व परिसर बकाल झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई महापालिकेमार्फत सुरू आहे. त्यामुळे या भागात फेरीवाल्यांचा फारसा उपद्रव नाही. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक तसेच महापालिकेच्या हद्दीत फेरीवाल्यांचा उपद्रव वाढला आहे. महापालिकेच्या ग प्रभागांतर्गत हा भाग येतो. डोंबिवली रेल्वे स्थानकात कल्याण, सीएसटी बाजूकडील जिन्यांवर दिवसभर फेरीवाले ठाण मांडून असतात. त्यामुळे प्रवाशांना मोठय़ा प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. डोंबिवलीत नुकत्याच स्थापन झालेल्या ‘सक्रिय नागरिक’ चळवळीच्या बैठकीतही याविषयी चर्चा झाली आहे. यासंबंधी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे एक तक्रार करण्यात येणार आहे. जनतेशी निगडित या महत्त्वाच्या प्रश्नांकडे खासदार आनंद परांजपे यांच्याकडून होत असलेले दुर्लक्ष नागरिकांच्या चर्चेचा विषय आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातही अशीच परिस्थिती दिसून येते. या भागातील पदपथांवर चपला, कपडे विक्रेत्यांच्या टपऱ्या पदपथ अडवून बसल्या आहेत. फळ, भाजी, कपडा विक्रेते रस्ता अडवून बसतात. रिक्षांच्या गर्दीमुळे रेल्वे स्थानक भागातून चालणे नागरिकांना अवघड झाले आहे. स्कायवॉकवर पुस्तके तसेच बॅग विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे.