बारावीच्या परीक्षेत सर्वात जास्त संवेदनशील केंद्रे चंद्रपूर जिल्ह्य़ात तर सर्वात कमी नागपूर विभागात आहेत. चंद्रपूरमध्ये २०, गोंदियामध्ये १६, भंडारा ७ नागपूर ग्रामीण ६, वर्धा ५, गडचिरोलीमध्ये ६ संवेदनशील केंद्राचा समावेश आहे.ग्रामीण भागातील अनेक शाळांना संवेदनशील घोषित केल्यामुळे त्या शाळा मंडळाविरुद्ध न्यायालयात गेल्याची माहिती मिळाली आहे. संवेदनशील शाळांमध्ये सर्वात जास्त शाळा या राजकीय नेत्याच्या किंवा त्यांच्याशी संबंधित आहे. गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्य़ातील अनेक केंद्र संवेदनशील म्हणून घेषित करण्यात आली असली त्या केंद्राना परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात आली आली आहे. ग्रामीण भागात कॉपीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे आणि याठिकाणी हमखास उत्तीर्ण होण्याची खात्री असल्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्र बदलविण्यासाठी कुठले तरी कारण देऊन मंडळाकडे येत आहेत. मात्र मंडळाचे अधिकारी अशा विद्यार्थ्यांची चाचपणी करीत आहेत.  
प्रतिनिधी, नागपूर
गेल्या काही दिवसांपासून शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षकांच्या असहकार आंदोलनामुळे परीक्षांवर असलेले अनिश्चितेचे सावट दूर झाल्यामुळे उद्या, गुरुवारपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांना प्रारंभ होणार आहे.
विदर्भात नागपूर विभागीय मंडळातून ३८३ परीक्षा केंद्रावर १ लाख ६५ हजार ९६० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. १ लाख ६५ हजार ९६० विद्याथ्यापैकी ७९ हजार ६११ विद्यार्थी व ८१ हजार ३४९ विद्यार्थिनीचा समावेश आहे. १ लाख ३६ हजार ३०७ विद्यार्थी नियमित असून २४ हजार ६५३ विद्यार्थी हे पुनर्परीक्षार्थी आहेत. विज्ञान शाखेत ५३ हजार १४०, वाणिज्य शाखेत २४ हजार ६५२ कला शाखेत ७९ हजार ७८२ व द्विलक्षी अभ्यासक्रमात ८ हजार ३८६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. भंडारा जिल्ह्य़ातून १९हजार २८०, चंद्रपूर १८ हजार १८०, नागपूर ६४ हजार ७०२, वर्धा १८ हजार ६६३, गडचिरोली १३ हजार ४६३ गोंदियामधून २२ हजार ६६८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी नागपूर विभागीय मंडळात परीक्षा मंडळातर्फे  प्रत्येक जिल्ह्य़ात सात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय मंडळाच्या १५ विशेष भरारी पथकासह जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्रौढ शिक्षण संस्था आदी संस्थाची एकंदर ६९ भरारी पथके राहणार असून मंडळाचे विशेष पथक अकस्मिक पथक म्हणून परीक्षेच्या दिवसात काम पहाणार आहेत. परीक्षा मंडळाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका विविध तालुक्यामध्ये पाठविल्या असून त्या कस्टोडियनच्या ताब्यात देण्यात आल्या आहे. नागपूर विभागात ८२ कस्टोडियन राहणार आहेत. केंद्र संचालकाच्या बैठकी घेण्यात आल्या आहेत.
यंदा परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी काही विशेष भरारी पथके तयार करण्यात आली असून ती पथके कुठलीही सूचना न देता केंद्रावर पोहचतील. परीक्षा केंद्रावर आळा घालण्यासाठी मंडळाने काही उपाययोजना केल्या आहेत. एका वर्गात ५ पेक्षा अधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले तर विद्यार्थ्यांसोबत संबंधीत केंद्रातील पर्यवेक्षक व शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार अध्ययन अक्षम (डिसेलेक्सिया, डिसकॅलक्युलिया , डिसग्राफीया ) विद्यार्थ्यांना (सर्व शाखातील) गणित विषयांसाठी आणि वाणिज्य शाखेतील पुस्तपालन आणि लेखाकर्म या विषयासाठी कॅलक्युलेटर वापरता येतील. परीक्षेदरम्यान मोबाईलचा वापर करण्यावर बंदी आणण्यात आली आहे. जे विद्यार्थी किंवा शिक्षक मोबाईल घेऊन त्याचा वापर करीत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे बोरकर यांनी सांगितले. परीक्षेच्या काळात होणारे गैरप्रकार बघता काही संवेदनशील केंद्रावर व्हीडियो  चित्रण करण्यात येणार आहे. कॉपी पुरविणे किंवा विद्यार्थ्यांनी कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांवर व संबंधित केंद्र अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.  
या  परीक्षेसाठी मंडळातर्फे सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनचे क्रमांक पुढीलप्रमाणे-  नागपूर- ०७१२ – २५५३५०३, अमरावती- ०७२१ – २६६२६०८.
अमरावती विभागात १.१२ लाख विद्यार्थी
प्रतिनिधी, अमरावती
बारावीच्या परीक्षेला अमरावती विभागातील १ लाख १२ हजार ४४ विद्यार्थी बसणार असून परीक्षेची पूर्ण तयारी मंडळाने केली आहे. शिक्षण संस्थाचालकांनी आंदोलन मागे घेतल्याने या परीक्षेच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे.
अमरावती विभागात एकूण ४४० परीक्षा केंद्रांवर बारावीच्या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपण येऊ नये आणि त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळावे, यासाठी शिक्षण मंडळाने ‘हेल्पलाईन’ सुरू केली आहे. विभागात अमरावती जिल्ह्यातून सर्वाधिक १२६ केंद्रांवर ३२ हजार ५८५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातून १०३ केंद्रांवर २५ हजार ४३९, बुलढाणा जिल्ह्यातून ८८ केंद्रांवर २१ हजार ९२३, अकोला जिल्ह्यातून ७४ केंद्रांवर २० हजार ६३२ आणि वाशीम जिल्ह्यातील ४९ परीक्षा केंद्रांवर ११ हजार ४६५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

Story img Loader