महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) गुरूवारपासून (२१ फेब्रुवारी) सुरू होत असून या परीक्षेवर विविध संघटनांनी टाकलेले बहिष्कार त्यांनी अखेरीस मागे घेतले आहेत. यावर्षी राज्यभरातून १२ लाख ९४ हजार ३६३ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात २१ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालावधीमध्ये बारावीची परीक्षा होणार असून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या वर्षी कोकण विभागामार्फत प्रथमच बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. यावर्षी ७ लाख ४३ हजार ९८८ विद्यार्थी आणि ५ लाख ५० हजार ३७५ विद्यार्थिनींनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्यात एकूण २ हजार ३२२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. परीक्षेच्या काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ासाठी ७ या प्रमाणे राज्यात २४५ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. यामध्ये महिला भरारी पथकांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. विभागीय स्तरावर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी समुपदेशन केंदं्र सुरू करण्यात आली आहेत.
यावर्षी वर्षांच्या सुरूवातीला जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. सुधारित वेळापत्रक महाविद्यालयांमध्ये आणि मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ‘विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सुधारित वेळापत्रक अधिकृत ठिकाणीच पाहावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असे आवाहन जाधव यांनी केले आहे.
संस्थाचालकांचे आंदोलन स्थगित
संस्थाचालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बारावीच्या परीक्षेला इमारती उपलब्ध करून न देण्याचा निर्णय घेतला होता. शिक्षणमंत्र्यांबरोबर १४ तारखेला झालेली चर्चा असफल ठरल्यानंतर हे आंदोलन मागण्या मान्य होऊपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेच्यावतीने घेण्यात आला होता. या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर परीक्षेमध्ये अडचणी येऊ नयेत यासाठी राज्य मंडळाकडून तयारी करण्यात आली होती. अखेरीस महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने त्यांचे आंदोलन स्थगित केले आहे. शिक्षणसंस्था महामंडळाचे सरकार्यवाह डॉ. आर. पी. जोशी यांनी सांगितले, ‘‘राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सध्या हे आंदोलन परीक्षांपुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल.’’
बंद काळात विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन
विविध कामगार संघटनांनी २१ फेब्रुवारीला बंद पुकारला आहे. त्याचा वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यास अडचण निर्माण होऊ नये यासाठी शासनाकडून कामगार संघटनांना आवाहन करण्यात आले आहे आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने मदत करण्याच्या सूचनाही शासकीय यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर १७ मार्चला रविवारी होणार असून त्या दिवशी मुंबईमध्ये मेगाब्लॉक न ठेवण्याची विनंती मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला करण्यात आली आहे.
बारावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) गुरूवारपासून (२१ फेब्रुवारी) सुरू होत असून या परीक्षेवर विविध संघटनांनी टाकलेले बहिष्कार त्यांनी अखेरीस मागे घेतले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-02-2013 at 03:44 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hsc exam prepartion complited protest roll back