मुख्याध्यापक संघटनांनी परीक्षेच्या दिवसात आंदोलनाचा पवित्रा घेतलेला असताना उद्या गुरुवारपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांना प्रारंभ होणार आहे. बारावीच्या परीक्षेच्या आधीच शिक्षकांनी मागण्यांसाठी आंदोलन मागे घेतल्यानंतर परीक्षा सुरळीत होतील, अशी अपेक्षा असताना मुख्याध्यापक संघटनेने आंदोलन पुकारले आहे. विदर्भात नागपूर विभागीय मंडळातून ४४४ परीक्षा केंद्रांवर १ लाख, ६४ हजार, ५२२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
यामध्ये ७८ हजार ६११ विद्यार्थी व ८० हजार ३४९ विद्यार्थिनींचा समावेश आहे. १ लाख ४२ हजार ४९३ विद्यार्थी नियमित असून २२ हजार २९ विद्यार्थी हे पुनर्परीक्षार्थी आहेत. विज्ञान शाखेत ६३ हजार ६८५, वाणिज्य शाखेत २३ हजार ९६४ कला शाखेत ९२ हजार ४९३ व द्विलक्षी अभ्यासक्रमात ८ हजार ३३६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
परीक्षेसंदर्भात माहिती देताना नागपूर विभागीय मंडळाचे सचिव अनिल पारधी यांनी सांगितले, गेल्या दोन वर्षांत कॉपीचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी झाले असले तरी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी नागपूर विभागीय मंडळात परीक्षा मंडळातर्फे प्रत्येक जिल्ह्य़ात सात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय मंडळाच्या १५ विशेष भरारी पथकासह जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्रौढ शिक्षण संस्था आदी संस्थांची एकंदर ४६ भरारी पथके राहणार आहेत.
मंडळाचे विशेष पथक अकस्मिक पथक म्हणून परीक्षेच्या दिवसात काम पाहणार आहे. परीक्षा मंडळाने विद्याथ्यार्ंच्या प्रश्नपत्रिका विविध तालुक्यांमध्ये पाठविल्या असून त्या कस्टोडियनच्या ताब्यात देण्यात आल्या आहे. नागपूर विभागात ७२ कस्टोडियन राहणार आहेत. केंद्र संचालकांच्या बैठकी घेण्यात आल्या आहेत. यंदा परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी काही विशेष भरारी पथके तयार करण्यात आली असून ती पथके कुठलही सूचना न देता केंद्रांवर पोहोचतील. परीक्षा केंद्रावर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मंडळाने काही उपाययोजना केल्या आहेत. एका वर्गात ५ पेक्षा अधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले तर विद्यार्थ्यांसोबत संबंधित केंद्रातील पर्यवेक्षक व शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे.
बाहेर गावातील सर्व परीक्षा केंद्रांवर प्रश्न आणि उत्तर पत्रिका पाठविण्यात आल्या असून शहरात मात्र असून उद्या गुरुवार सकाळपर्यंत कस्टोडियनच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे पारधी यांनी सांगितले. ग्रामीण भागात शाळांमध्ये प्रश्न पत्रिका व उत्तरपत्रिका ठेवण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्या त्या गावातील पोलीस ठाण्यात कस्टडीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. इंग्रजी विषयासाठी बहुसंची प्रश्नपत्रिका असून पाठय़पुस्तकावर आधारित प्रश्नामध्ये ३० टक्क्यांपर्यंत फरक असू शकेल. तोंडी परीक्षा आणि पर्यावरण विषयासंबंधी परीक्षा शाळांनी घेतल्या असून त्यांचे गुणांकन शाळेतील शिक्षकांनीच केले आहे.
अमरावती विभागात १.२२ लाख परीक्षार्थी
बारावीच्या परीक्षेसाठी अमरावती विभागातील एकूण १ लाख २२ हजार २२९ परीक्षार्थीना विभागीय मंडळाने ओळखपत्रे वितरित केली असून उद्या, २० फेब्रुवारीपासून अमरावती विभागातील पाच जिल्ह्य़ांमधील ६०९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेची सर्व तयारी विभागीय मंडळाने केली असून परीक्षा केंद्रांवर सर्व साहित्य पोहोचवण्यात आले आहे. कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी गेल्या १५ ऑगस्टपासून पालकसभांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती अमरावती विभागीय मंडळाचे अध्यक्ष संजय गणोरकर यांनी दिली. बारावीच्या परीक्षेसाठी विभागातून १ लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रांवर ‘हेल्पलाईन’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
*न्यायालयाच्या आदेशानुसार अध्ययन अक्षम
( डिस्लेक्सिया, डिसकॅलक्युलिया , डिसग्राफीया ) विद्याथ्यार्ंना (सर्व शाखातील) गणित विषयांसाठी आणि वाणिज्य शाखेतील पुस्तपालन आणि लेखाकर्म या विषयासाठी कॅलक्युलेटर वापरता येतील. परीक्षेदरम्यान मोबाईलचा वापर करण्यावर बंदी आणण्यात आली आहे. जे विद्यार्थी किंवा शिक्षक मोबाईल घेऊन त्याचा वापर करीत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे पारधी यांनी सांगितले. परीक्षेच्या काळात होणारे गैरप्रकार बघता काही संवेदनशील केंद्रावर व्हीडियो चित्रण करण्यात येणार आहे. कॉपी पुरविणे किंवा विद्यार्थ्यांंनी कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांवर व संबंधित केंद्र अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. या परीक्षेसाठी मंडळातर्फे सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनचे क्रमांक पुढीलप्रमाणे- नागपूर- ०७१२ – २५५३५०३, अमरावती- ०७२१ – २६६२६०८.
सर्वात जास्त संवेदनशील केंद्रे गोंदिया जिल्ह्य़ात
बारावीच्या परीक्षेत सर्वात जास्त संवेदनशील केंद्र गोंदिया जिल्ह्य़ात तर सर्वात कमी भंडारा विभागात आहे. चंद्रपूरमध्ये १३, गोंदियामध्ये २६, भंडारा ३, नागपूर ग्रामीण ५, वर्धा ८, गडचिरोलीमध्ये ३ संवेदनशील केंद्रांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळांना संवेदनशील घोषित केल्यामुळे त्या शाळा मंडळाविरुद्ध न्यायालयात गेल्याची माहिती मिळाली आहे. गेल्यावर्षी ज्या केंद्रांवर पाचपेक्षा अधिक विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले, अशी केंद्रें संवेदनशील केंद्र म्हणून घोषित करण्यात आली. संवेदनशील शाळांमध्ये सर्वात जास्त शाळा या राजकीय नेत्यांच्या किंवा त्यांच्याशी संबंधित आहेत. गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्य़ांतील अनेक केंद्रे संवेदनशील म्हणून घेषित करण्यात आली असली त्या केंद्रांना परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. ग्रामीण भागात कॉपीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे आणि या ठिकाणी उत्तीर्ण होण्याची खात्री असल्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्र बदलविण्यासाठी कुठले तरी कारण देऊन मंडळाकडे येत आहेत. मात्र, मंडळाचे अधिकारी अशा विद्याथ्यार्ंची चाचपणी करीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा