बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी उचललेल्या कठोर पावलांमुळे सोलापूर जिल्हय़ात परीक्षेच्या पहिल्या दिवशी अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील अपवाद वगळता कोठेही कॉपीचा प्रकार आढळून आला नाही. जिल्हय़ात बारावीच्या परीक्षेसाठी ८४ केंद्रांतून ४८ हजार ७४ विद्यार्थी बसले आहेत.
अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे परीक्षा केंद्रात मराठीचा पेपर देताना कॉपी करणाऱ्या तिघा विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध परीक्षेतील गैरप्रकार प्रतिबंधक कायदा १९८२ कायदा व भारतीय दंड संहिता कायद्यातील कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षणाधिकारी जे. एस. शिवशरण यांच्या अधिपत्याखाली सहा भरारी पथके व ८४ बैठी पथके कार्यरत आहेत. परीक्षा केंद्रांच्या परिसरात मुंबई पोलीस कायद्यातील तरतुदीनुसार १४४ कलम जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांच्या परिसरात विद्यार्थ्यांशिवाय तसेच कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांशिवाय अन्य कोणाही व्यक्तीला फिरकता येणार नाही. जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी बारावीच्या परीक्षेत कॉपी होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेण्याच्या सूचना देत एखाद्या परीक्षा केंद्रावर कॉपी आढळल्यास त्यास संबंधित परीक्षा केंद्राला जबाबदार ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे एकंदरीतच या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरू झाल्याचे दिसून येते.

Story img Loader