यावर्षी बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करावे लागले. मात्र, पुढील शैक्षणिक वर्षीही वर्षांच्या सुरूवातीलाच वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
जाधव म्हणाले, ‘‘वर्षांच्या सुरूवातीलाच वेळापत्रक आणि अभ्यासक्रम दोन्हीही समोर असताना त्याचे योग्य नियोजन करून अभ्यासक्रम पूर्ण करणे ही प्राचार्याची आणि शिक्षकांची जबाबदारी होती. शिक्षकांना वेळापत्रक किंवा अभ्यासक्रमाबाबत काही तक्रारी होत्या, तर त्यांनी या तक्रारी वर्षांच्या सुरूवातीलाच मांडणे आवश्यक होते. नागपूर विभागामध्ये सर्व अभ्यासक्रम वेळेत पूर्ण झालेही होते. मात्र, केवळ लोकभावना लक्षात घेऊन वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
वर्षांच्या सुरूवातीलाच परीक्षेचे वेळापत्रक मिळण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे ही पद्धत बंद केली जाणार नाही. पुढील वर्षीही परीक्षेचे वेळापत्रक वर्षांच्या सुरूवातीलाच जाहीर करण्यात येईल. बारावीच्या परीक्षेसाठी ४५ वैकल्पिक
विषय आहेत. विद्यार्थी यातील कोणतेही विषय निवडू शकतात. त्यामुळे वेळापत्रक तयार करताना प्रत्येक विषयाचा स्वतंत्रपणे विचार करावा लागतो. त्यामुळे अचानक कोणत्याही कारणास्तव वेळापत्रक बदलण्याची आवश्यकता भासली, तर अडचणी निर्माण होतात. त्यासाठी पुढील वर्षी विषयांचे गट करून
त्यानुसार विद्यार्थ्यांना विषय निवडीचा पर्याय देण्याचा विचार सध्या करण्यात येत आहे.’’