फेब्रुवारी-मार्च २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत लातूर विभागातील तिन्ही जिल्हय़ांचा सरासरी निकाल ८३.५४ टक्के लागला असून, विद्यार्थिनींचे उत्तीर्णतेचे प्रमाण विद्यार्थ्यांच्या तुलनेत या वर्षीदेखील अधिक आहे.
लातूर विभागातील नांदेड, उस्मानाबाद व लातूर या तीन जिल्हय़ांतील ५९ हजार १४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४९ हजार ४०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल ८१.८३, कला शाखेचा ७६.१६, वाणिज्य शाखेचा ७८.४६ तर व्यवसायाभिमुख शिक्षण विभागाचा निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. नेहमीप्रमाणे विभागात लातूर जिल्हा आघाडीवर असून लातूर जिल्हय़ाचा विज्ञान शाखेचा निकाल ९४.१५, नांदेडचा ९१.०३, तर उस्मानाबादचा ८७.३३ टक्के आहे. कला शाखेत उस्मानाबाद जिल्हय़ाचा ७९.८९, लातूरचा ७६.०६ तर नांदेडचा ७४.३१ टक्के निकाल आहे. वाणिज्य शाखेत लातूरचा निकाल ७९.८३, उस्मानाबाद- ७८.८६ तर नांदेडचा ७५.९१ टक्के आहे. नांदेड जिल्हय़ात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७९.१० तर मुलींचे ८४.८० आहे. उस्मानाबाद जिल्हय़ात मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ७९.५३ तर मुलींचे प्रमाण ८७.९७ टक्केआहे. लातूर जिल्हय़ात मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८३.८७ तर मुलींचे प्रमाण ८७.७३ टक्के आहे.
दहावीच्या निकालाच्या तुलनेत बारावीच्या निकालात तब्बल २० टक्के वाढ लातूर विभागातील विद्यार्थ्यांनी केली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप सहस्रबुद्धे यांनी पत्रकारांना दिली.

Story img Loader